पिंपरी, दि. ०८ मे २०२३ (पीसीबी) – तळवडे करसंकलन कार्यालयात दिलेला माहिती अधिकाराचा अर्ज व तक्रारी मागे घे, अन्यथा तुला बघून घेऊ’ अशी धमकी देणाऱ्या तळवडे करसंकलन कार्यालयातील मुख्य लिपीक हेमंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत दिपक खैरनार यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.08-05-2023 रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यमुनानगर, निगडी येथील तळवडे करसंकलन विभागीय कार्यालयात माहिती अधिकार अर्ज तसेच तक्रार अर्जाच्या चौकशी कामी गेलो होतो. तेथे असणारे मुख्य लिपीक श्री.हेमंत विठ्ठल जाधव यांना आम्ही दि.11-04-2023 रोजी दिलेला माहिती अधिकाराचा अर्ज तसेच मिळकतकर आकारणीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी अर्जाबाबत विचारणा केली. तसेच अद्याप सदरील अर्जाची आम्हास माहिती मिळाली नसल्याने आम्हास लवकरात-लवकर माहिती उपलब्ध करून देण्यात यावी,अशी विनंती केली.
यावर श्री.हेमंत विठ्ठल जाधव यांनी ‘तूझ्या अर्जाला उत्तर द्यायला, मी काय बांधील आहे का? तू दिलेला अर्ज मागे घे, तुला प्रेमात सांगतोय. यावर मी त्यांना म्हणालो की, सर मी माहिती अधिकारात अर्ज दिला आहे. त्या अर्जाच्या व्यतिरिक्त आपण आम्हास अशी भाषा का वापरताय? तुम्ही चुकीचे बोलत आहात. असे आम्ही बोलल्यानंतर श्री.हेमंत विठ्ठल जाधव यांनी आम्हास ‘तू मला ओळखले नाहीस, मी इथला गाववाला आहे. तुला माझी जिथे तक्रार करायची असेल तेथे कर, कुणीच माझे वाकडे करू शकत नाही.आणि तू जर तो माहिती अधिकाराचा अर्ज, तुझ्या सर्व तक्रारी मागे घेतल्या नाहीस तर तुला बघून घेऊ, तुला 353 मध्ये अडकवू असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार आम्ही त्या विभागाचे सहा.मंडलाधिकारी श्री.काळे सर यांना सांगितला. त्यांनी आम्हास हेमंत जाधव यांना आम्ही समज देऊ, असे सांगितले.
हा संपूर्ण प्रकार पाहता श्री.हेमंत विठ्ठल जाधव हे गुंड प्रवृत्तीचे दिसून येत असल्याने भविष्यात त्यांच्यापासून अथवा त्यांच्या हस्तकांमार्फत आमच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो किंवा आम्हास खोट्या केसेसमध्ये अडकवले जाऊ शकते. तरी या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे दिपक खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.