मासिक पाळीविषयी असणारे गैरसमज आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक- डॉ.लक्ष्मण गोफणे

0
18

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

पिंपरी, २८ मे २०२५ : मासिक पाळीविषयी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनभिज्ञता आणि गैरसमज हे महिलांसाठी घातक ठरतात. योग्य माहितीच्या अभावामुळे त्यांना अनेकदा संसर्ग,गर्भाशयासंबंधी विकारांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मासिक पाळीविषयी न्यूनगंड न बाळगता निसंकोचपणे चर्चा केली पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने हाती घेण्यात येत असतात, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

२८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो.२०१४ पासून सुरू झालेली ही जागतिक मोहीम आहे. यामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मासिक पाळीबाबतचा गैरसमज दूर करणे हा आहे. बुधवारी (२८ मे) जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये डॉ.गोफणे बोलत होते. महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोरी नलावडे, डॉ. अंजली ढोणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत सुपेकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे, शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड, सीएसआर सेलचे विजय वावरे, प्रशांत शर्मा, युनिसेफचे राज्यस्तरीय वरिष्ठ सल्लागार संदीप तेंडुलकर, सीवायडीएचे कार्यकारी संचालक प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

उपायुक्त सचिन पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘सफाई कामगार महिलांनी कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा आणि सुरक्षा साधनांचा वापर करावा. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक समस्यांबाबत निसंकोचपणे संवाद साधावा.महानगरपालिका देखील सातत्याने महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम घेत असते,’ असेही उपायुक्त पवार म्हणाले.

युनिसेफचे सल्लागार संदीप तेंडुलकर यांनी यावेळी मासिक पाळीबाबत समज-गैरसमज याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. समाजाने याकडे लाजिरवाण्या विषयाप्रमाणे न पाहता, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबीसारखे पाहणे आवश्यक आहे. कारण आरोग्यदृष्ट्या सक्षम, सशक्त आणि सन्मानित स्त्री ही केवळ कुटुंबाच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती शिरतर व वसीम शेख यांनी केले. या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.