मावळ, दि. १७ (पीसीबी) : – विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. त्यामुळे आता मावळ विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारीवरून रस्सीखेच पहायला मिळत आहे. सध्या मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्येच रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची पक्षाकडून राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या पदाची मागणी केली नाही त्यामुळे हे पद नको. तर मावळ विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी मागितली असून पक्षाने माझी उमेदवारी जाहीर करावी अशी भूमिका बापू भेगडे यांनी घेतली आहे. पत्रकार परिषद घेत बापू भेगडे यांनी ही भूमिका मांडली. परंतु यामुळे आता विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली असून उमेदवारीला अजित पवार गटातूनच विरोध असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
काल राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदाची किंवा कोणतीही पदाची मी मागणी केली नाही. मी आग्रह धरला विधानसभेचा. त्याचाही निर्णय आतापर्यंत झालेला नाही. मी पक्षाकडे विधानसभेची मागणी केली आहे. आम्ही अजित पवारांना भेटलो. त्यावेळी एक गोष्ट निदर्शनास आली. अजित पवार म्हणाले, तुमच्या दोघांची नावे आहेत, त्यांचा आम्ही विचार करू. त्यांनी विचार करू म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर नाही. मात्र, मला राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याची बातमी समजली. ज्या कार्यकर्त्यांनी मागितली आहे, त्यांना ते दिलं गेलं पाहिजे. कारण, मी एका पदावर आहे, आणि मी ज्या पदाची मागणी केली,त्याचा अद्याप निकाल आला नाही. मला खात्री आहे, मला उमेदवारी मिळणार आहे, जर काही निर्णय बदलला गेला, तर आम्ही कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्याबाबत निर्णय घेऊ, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदापेक्षा मी मोठ्या पदावर काम करतो आहे. मी ज्या पदाची मागणी केली आहे, ते मिळावं अशी मागणी आहे, असंही यावेळी बोलताना बापू भेगडे यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. आता लवकरात लवकर पक्षांचं जागावाटप आणि उमेदवार निवडी पार पडतील. सगळ्या पक्षांकडून जागावाटप ठरून उमेदवारांची नावं घोषित केली जाणार असल्याची चर्चा असतानाच आता पक्षांतर्गत धुसफूस समोर येताना दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे संकेत आता दिसू लागले आहेत.
मावळमध्ये अजित पवार गटाचे नेते बापू भेगडे यांनी महामंडळाचं पद नाकारलं असून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत. याबद्दल अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या अडचणी वाढल्याचं चित्र दिसून येत आहे.