मावळ विधानसभा उमेदवारीसाठी भाजप बरोबर राष्ट्रवादीतही चुरस, आमदार शेळके यांची गोची

0
95

मावळ, दि. ०३ (पीसीबी) : महायुतीमध्ये मावळ विधानसभेसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात सुरवातीला माजी मंत्री बाळा भेगडे आणि रविंद्र भेगडे यांनी भाजपकडून जोरदार तयारी सुरू केल्याने रंगत वाढली. अशातच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बापू भेगडे यांनीही आग्रही मागणी सुरू केल्याने आमदार शेळके यांची अडचण वाढली आहे. महायुतीत ज्याला संधी मिळणार त्याच्या विरोधात महाविकासआघाडीकडून नाराज नेत्याला गळाला लावण्याच्या हालचाली सुरू आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून तयारी सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार मतदारसंघात सभा-बैठका घेताना दिसत आहे. महायुतीत आणि महाविकास आघाडीत तीन-तीन पक्ष असल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मावळ मतदारसंघातून बापू भेगडे यांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्येच मावळ विधानसभेच्या जागेवरुन कलगीतुरा रंगू लागला आहे. कारण मावळ विधानसभेच्या जागेवरती अजित पवार गटातीलच मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते बापू भेगडे यांनी देखील दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मावळ विधानसभेची उमेदवारीची मागणी केली असल्याची कबुली बापू भेगडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. त्यामुळे सध्या मावळ विधानसभेच्या जागेवरती केवळ भाजपच नव्हे तर अजित पवार गटामध्ये देखील चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे.

बापू भेगडे म्हणाले, मावळमध्ये सुनील शेळके कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. याबद्दल तळेगावचे राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष भेगडे यांनी सुनील शेळके यांच्यावरती ताशेरे ओढले होते. यावरून बापू भेगडे यांनीही सर्व अजित पवारांच्या कानावर घातले असल्याचे सांगितले. त्याशिवाय यावेळी त्यांनी शेळके यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. आपल्या कार्यकर्त्यांना सूचनाही केली.सोशल मीडियातून कार्यकर्त्यांच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याविषयी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन यावेळी बापू भेगडे यांनी केले. त्याशिवाय आपण विधानसभेला इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले.

महायुती मधील भाजपने देखील मावळ विधानसभेच्या जागेवरती दावा केला आहे. तर विद्यमान आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे मावळ विधानसभा कुणाकडे जाणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
अजित पवारांकडे मावळ जाणार का? असा प्रश्न असतानाच आता अजित पवार यांच्यापुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

सुनील शेळके विद्यमान आमदार आहेतच. त्यांना तिकिट मिळणार, असा अंदाज वर्तवला जात होता. पण बापू भेगडे यांनी आपण इच्छूक असल्याचं सांगत दावा ठोकला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे