- कर्जतच्या चौक नाका येथे इंडिया आघाडीची समन्वय बैठक
- सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा संजोग वाघेरेंना विजयी करण्याचा निश्चय
कर्जत, दि. १५ (पीसीबी) – लोकशाही संपविण्याचा प्रयत्न हुकूमशाही माध्यमातून सुरू आहे. देशाच्या हितासाठी, तसेच गद्दारी करणा-यांना धडा शिकविण्यासाठी सर्व मिळून आपली ताकद पणाला लावू आणि आगामी निवडणुकीत मावळ लोकसभेवर इंडिया आघाडीचा झेंडा फडकवू, असे आवाहन शिवसेना सचिन अहिर यांनी केले. त्यांच्यासह रायगड जिल्ह्याकील आघाडीतील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा संजोग वाघेरेंना विजयी करण्याचा निश्चय यावेळी केला.
मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील सर्व राजकीय पक्ष आणि संघटना यांचे शहराध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समन्वय बैठक बुधवारी (दि.14) कर्जत येथील चौक नाका येथे पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना सचिन अहिर बोलत होते. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील, शिवसेना उरणचे माजी आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्ह्याचे प्रभारी प्रशांत पाटील, शिवसेना नेते समन्वयक बबन पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे प्रितम म्हात्रे, पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, श्रीनाथ पाटील, आम आदमी पार्टीचे पनवेल विधानसभा अध्यक्ष शेखर जांभळे, पनवेल समाजवादी पार्टीचे अध्यक्ष नाईक साहेब, काँग्रेसचे पनवेल विधानसभा अध्यक्ष सुदाम पाटील, मावळ लोकसभा समन्वयक (शरदचंद्र पवार गट) सुवर्णा जोशी, भावणाताई घाणेकर, खालापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष जंगम यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आदी उपस्थित होते.
देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असून भाजप सरकार संविधान संपवण्याचे काम करत असल्याचे सांगत सचिन अहिर यांनी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे केले. ते पुढे म्हणाले की, शिवसेना सोडून गद्दारांना मावळ मतदारसंघात गाडून टाकणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे होऊ शकले नाही. ते तुमचे आणि आमचे काय होणार, असा थेट सवाल गद्दारी करणा-यांना त्यांनी केला. तसेच इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघरे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही ते म्हणाले.
मावळ लोकसभेच्या विकासासाठी कटिबद्ध: संजोग वाघेरे
पुणे आणि रायगड अशा दोन भागात विस्तारलेला हा मावळ लोकसभा मतदारसंघ अनेक अर्थाने महत्वाचा आहे. या मतदारसंघात वेगवेगळे प्रश्न आणि वेगवेगळ्या समस्या आहेत. सोबतच्या आपल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन या समस्या सोडवण्यासाठी, तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे यावेळी संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले. आपल्या सर्वांना मिळून ही लढाई लढायची असून भविष्यातही चांगली वाटचाल करायची असल्याचे ते यावेळी उपस्थित इंडिया आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले.