पिंपरी, दि.२० (पीसीबी)- मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोणावळा-पुणे-लोणावळा लोकल सेवा दिवसभर धावणे, सिंहगड एक्सप्रेसच्या कोचमध्ये वाढ करण्यासह रेल्वेसंदर्भातील विविध प्रश्नांबाबत उठविलेल्या आवाजाची रेल्वेमंत्र्यांनी दखल घेतली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज (मंगळवारी)खासदार बारणे यांना बोलावून घेत प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला.
पुणे-लोणावळा लोकल दिवसभर धावणे, घाट भागात नवीन तंत्रज्ञान वापरुन बदल करणे, कर्जत-पनवेल लोकल रेल्वे मार्गाच्या कामाला गती दिली जाईल, अशी हमी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली. त्यामुळे मावळातील प्रलंबित असलेल्या रेल्वेच्या कामांना गती मिळेल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात खासदार बारणे यांनी मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांकडे सरकारचे लक्ष्य वेधले होते. त्याची तत्काळ दखल रेल्वेमंत्री वैष्णव यांनी घेतली. प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेवून कामे तत्काळ मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
रेल्वे मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, ”सिंहगड एक्सप्रेसचे कोच वाढवावेत. पुणे-लोणावळा दरम्यान लोकल रेल्वे दिवसभर धावावी. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना लोणावळा, कर्जत स्थानकावर थांबा मिळावा. मावळ लोकसभा मतदारसंघात सुरु असलेली रेल्वे अंडरपास, ओव्हर ब्रीज, नेरळ रेल्वे स्टेशनच्या कामाला गती द्यावी याबाबत विविध संसदीय आयुधांचा वापर करत सभागृहात आवाज उठविला. रेल्वेचे स्थानिक अधिकारी लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडे, प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याकडे रेल्वे मंत्र्यांचे लक्ष्य वेधले होते”.
त्याअनुषंगाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बोलावून घेत मावळ मतदारसंघातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. पुणे विभागाच्या तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रेणु शर्मा यांच्या कार्यकाळात रेल्वेची कामे अतिशय संथगतीने सुरु होती. तक्रारींवर त्या व्यवस्थित उत्तरे देत नव्हत्या. उद्धटपणे बोलत होत्या, अशी तक्रार खासदार बारणे यांनी केली. त्यावर रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, शर्मा यांची बदली केली आहे. तरी, देखील तुमच्या तक्रारीची शर्मा यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
पुढे खासदार बारणे म्हणाले, ”देखभालीच्या कामासाठी काही वेळ रेल्वे सेवा बंद केली जाते. त्याच्या वेळेबाबात नागरिकांच्या काही मागण्या आहेत. त्याचाही विचार करावा. पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेतही लोकल धावावी. त्यामुळे विद्यार्थी, कामगारांचे हाल होणार नाहीत. सिंहगड एक्सप्रेसच्या बदललेल्या बोगी व्यवस्थेमुळे सीटांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सकाळी पुण्याहून मुंबईला जाणा-या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यासाठी एक्सप्रेसचे दोन कोच वाढविण्यात यावेत. कर्जत-पनवेल लोकल रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी. पनवेल, उरण पर्यंतची रेल्वेची कामे जलगतीने करावीत. पनवेल हद्दीतील रेल्वे स्थानकांवर सोयी-सुविधा द्याव्यात”.
”कर्जत वरुन लोणावळ्याकडे येताना रेल्वेला नवीन इंजिन लावले जाते. त्यात वेळ जातो. त्याबाबत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. नव्याने डीपीआर तयार करावा. पुणे-लोणावळा घाट भागात काही बदल करता येतील का, त्यासाठी जलद गतीचे नवीन मार्ग तयार करता येईल का, यासंदर्भात पडताळणी करावी. नवीन मार्ग तयार झाला. तर, वेगात रेल्वे धावतील”, अशा विविध मागण्या खासदार बारणे यांनी केल्या.
कर्जत-पनवेल लोकल रेल्वे मार्गासह सर्व कामांना गती दिली जाईल – रेल्वेमंत्री
त्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, ”पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेतही लोकल रेल्वे धावली जाईल. सिंहगड एक्सप्रेसच्या कोचमध्ये वाढ केली जाईल. कर्जत-पनवेल लोकल रेल्वे मार्गाच्या कामाला गती दिली जाईल. पनवेल, उरण पर्यंतची रेल्वेची कामे प्रगतीपथावर असून जलगतीने करण्यावर भर दिला जाईल. पनवेल हद्दीतील रेल्वे स्थानकांवर सिडकोच्या मदतीने सोयी-सुविधा देण्याबाबत प्रयत्न केले जातील. पुणे-लोणावळा घाट भागात जलदगतीने मार्ग करण्यासाठीचा डीपीआर तयार केला जाईल. त्याकरिता एजन्सी नेमण्यात येईल. याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांना सूचना दिल्या जातील”.