मावळ लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगांना होणार साहित्य पुरवठा, दिव्यांग तपासणी शिबिराला सुरुवात..

0
340

पिंपरी दि. ११ (पीसीबी)- शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि केंद्र सरकारचा दिव्यांग विभाग, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने मावळ लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग नागरिकांना साहित्य पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी कर्जत येथून दिव्यांग तपासणी शिबिराचा खासदार बारणे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.10) शुभारंभ झाला. सहाही विधानसभा मतदारसंघात 20 जूनपर्यंत हे तपासणी शिबिर होणार असून मतदारसंघातील 5 हजारहून अधिक दिव्यांग नागरिकांना साहित्य पुरवठा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तपासणी शिबिराच्या शुभारंभप्रसंगी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, शिवसेना शहरप्रमुख भालचंद्र जोशी, नगरसेविक संचिता पाटील, प्राची ढेरवणकर, नगरसेवक मनू दांडेकर, माजी नगरसेवक संतोष पाटील, उपतालुका प्रमुख बाबू घारे, युवाअधिकारी मयुर जोशी, प्रथमेश मोरे, दिनेश भोईर, योगेश दाभाडे, अपंग संघटनेचे अध्यक्ष अमर साळेखे, बाजीराव दळवी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”केंद्र सरकारच्या दिव्यांग विभाग, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांग साहित्याचे वाटप केले जाते. त्यानुसार मावळ मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींना साहित्य दिले जाणार आहे. त्याकरिता दिव्यांग तपासणी शिबिराची शुक्रवारी कर्जत येथून सुरूवात केली. 13 जून रोजी पनवेल, 15 जूनला मावळ, 16 जून रोजी पिंपरी-चिंचवड आणि 20 जून रोजी उरणमध्ये नोंदणी शिबिर होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जाते. नोंदणीनंतर दीड ते दोन महिन्यात साहित्य वाटपाचा कार्यक्रम केला जाणार आहे”.

”या शिबिरात दिव्यांगांची नोंदणी केल्यानंतर तपासणी पश्चात पात्र लाभार्थ्यांना आवश्यक साहित्य वाटप केला जाईल. यामध्ये व्हिलचेअर, ट्रायसिकल, कुबड्या, रोलेटर, कॅलिपर, कृत्रिम अवयव, श्रवणयंत्र, एम.आर.किट, स्मार्ट केन, लो व्हिजन कट, डायसी प्लेअर, कुष्ठरोग किट इत्यादी साहित्याचा समावेश आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग नागरिकांची नोंदणी केली जाणार आहे. मतदारसंघात पाच हजारहून अधिक दिव्यांग नागरिकांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे. दिव्यांगाना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. मतदारसंघातील सर्व दिव्यांग नागरिकांनी पुढे येऊन तपासणी शिबिरात नोंदणी करुन घ्यावी” असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.