मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

0
202

मावळ लोकसभा निवडणूकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली.

मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या ४ जून २०२४ रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी माहिती देताना दीपक सिंगला बोलत होते.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत खराडे, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के, मनिषा तेलभाते, माध्यम समन्वयक किरण गायकवाड, निवडणूक निरीक्षक समन्वयक प्रमोद ओंभासे, मनुष्यबळ कक्ष समन्वयक राजू ठाणगे आदी उपस्थित होते.

मतदानाची टक्केवारी
मावळ लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूकीसाठी १३ मे २०२४ रोजी एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीमध्ये एकूण ५४.८७ टक्के एवढे मतदान झाले. यामध्ये पनवेल ५०.०५ टक्के, कर्जत ६१.४० टक्के, उरण ६७.०७ टक्के, मावळ ५५.४२ टक्के, चिंचवड ५२.२० टक्के आणि पिंपरी ५०.५५ टक्के असे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान झाले आहे.

येत्या ४ जून २०२४ रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून या निवडणूक मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल.

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना
मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी २४ टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २३ फेऱ्या होणार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीच्या २५ फेऱ्या होतील. उरण विधानसभा मतदारसंघासाठी १४ मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २५ फेऱ्या होणार आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघासाठी १६ टेबल लावण्यात येणार असून २५ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २४ मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून २३ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी १६ मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून २५ मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र ५ मतमोजणी टेबलसह एकूण ११३ टेबलवर मतमोजणी होईल.

मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती
निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या अधिपत्याखाली मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण १ हजार ५३० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. पनवेलसाठी १ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १ अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १० इतर अधिकारी, २७ सुक्ष्म निरीक्षक, २७ मतमोजणी पर्यवेक्षक, २७ मतमोजणी सहाय्यक, १० तालिका कर्मचारी, ३५ शिपाई, १०० हमाल आणि १०० इतर कर्मचारी असे एकूण ३३८ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

कर्जतसाठी १ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ३ अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ७ इतर अधिकारी, २० सुक्ष्म निरीक्षक, २० मतमोजणी पर्यवेक्षक, २० मतमोजणी सहाय्यक, २२ तालिका कर्मचारी, ६५ इतर कर्मचारी तसेच शिपाई व हमाल यांच्यासह एकूण २१८ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

उरणसाठी १ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ३ अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ६ इतर अधिकारी, २० सुक्ष्म निरीक्षक, १९ मतमोजणी पर्यवेक्षक, १९ मतमोजणी सहाय्यक, ६ तालिका कर्मचारी, ३५ इतर कर्मचारी तसेच शिपाई व हमाल यांच्यासह एकूण १९९ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मावळसाठी १ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १ अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १५ इतर अधिकारी, २५ सुक्ष्म निरीक्षक, २३ मतमोजणी पर्यवेक्षक, २६ मतमोजणी सहाय्यक, १३ तालिका कर्मचारी, ५० इतर कर्मचारी तसेच शिपाई व हमाल यांच्यासह एकूण २२९ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

चिंचवडसाठी १ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १ अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १८ इतर अधिकारी, ७७ सुक्ष्म निरीक्षक, ८ मतमोजणी पर्यवेक्षक, ५९ मतमोजणी सहाय्यक, ३१ तालिका कर्मचारी, ९१ इतर कर्मचारी तसेच शिपाई व हमाल यांच्यासह एकूण ३५६ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

पिंपरीसाठी १ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १ अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, २ इतर अधिकारी, ३६ सुक्ष्म निरीक्षक, २१ मतमोजणी पर्यवेक्षक, २४ मतमोजणी सहाय्यक, १४ तालिका कर्मचारी, ७१ इतर कर्मचारी तसेच शिपाई व हमाल यांच्यासह एकूण १९० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधीत वस्तू आणण्यास मनाई
निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना याबाबत सूचना देणे अनिवार्य आहे. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी सांगितले.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच अधिकृत माध्यम प्रतिनिधींना बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश दिला जाईल. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राजवाडा गेटने प्रवेश दिला जाईल. १५० मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधीत करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपुर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी केले.