मावळ मतदारसंघातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील रेल्वे कामांना गती

0
371

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

मावळ, दि. १५ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील मुंबई विभागातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील (खंडाळा) भागात सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वेच्या कामांना गती मिळाली आहे. लोणावळा, कर्जत येथील ओव्हर ब्रिजसह अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत. प्रलंबित कामे पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघ रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागात येतो. मुंबई विभागात पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, डोंगरगाव, खंडाळा हा मावळ मतदारसंघातील भाग येतो. मुंबई विभागातील मतदारसंघातील रेल्वेच्या विविध कामासंदर्भात खासदार बारणे यांनी मुंबई रेल्वे विभागाचे डीआरएम रजनीश के. गोयल यांच्या समवेत नुकतीच बैठक घेतली. सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्प आणि नवीन कामे हाती घेण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

मुंबई मध्य रेल्वे अतंर्गत येणाऱ्या लोणावळा ते मुंबई या मार्गातील गेट क्रमांक २२ अंबिवली, २३ भिवपुरी, २५ अषाने कोषाने, २६ सावरगाव,

२७ किरवली हे सर्व कर्जत तालूक्यातील

तसेच गेट क्रमांक ३४ डोंगरगाव, २९ खंडाळा गावठाण आणि गेट क्रमांक ३१ जुना खंडाळा (लोणावळा ) येथे रेल्वे ओव्हर ब्रिजचे कामे केली जाणार आहेत. ही कामे लवकरात लवकर सुरू करावीत. पनवेल ते खारकोपर लोकल सेवा सुरू आहे. खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाला गती देवून पूर्णत्वाकडे नेण्याबाबत सूचना केल्या. लोणावळा, कर्जत येथील ओव्हर ब्रिजच्या कामाला गती द्यावी.

अनेक नवीन कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. नेरळ रेल्वे स्टेशनच्या कामाला गती द्यावी. याशिवाय नेरळ ते माथेरान दरम्यान चालू असलेल्या ट्राय ट्रेनचा आढावा घेतला. त्यातील काही त्रुटीमध्ये सुधारणा करावी. पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या. पनवेल रेल्वे सेवेचाही आढावा घेतल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.