पिंपरी दि. १४ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर प्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघासाठीसुध्दा भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मावळात शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हे सलग दोन वेळा विजयी झाले. आता भाजप बरोबर शिंदे गटाची युती असतानाही या जागेवर भाजपनेही जोर बैठका वाढवल्याने बारणे यांचे टेन्शन वाढले आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे भाजपने या मदारसंघाची संपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकिसाठी भाजपने राज्यातील ४८ मतदारसंघासाठी आपले स्वतंत्र प्रतिनिधी नुकतेच नियुक्त केले. या ४८ जणांच्या यादीतच भाजपचे संभाव्य उमेदवार दडलेले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोपविण्यात आली असून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आमदार लांडगे यांनी ओझर गणपती येथे भाजपच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघ प्रमुखांची नुकतीच एक विशेष बैठक घेऊन दौरा सुरू केला. पक्षाने उमेदवारी दिलीच तर लढणार आणि जिंकणार, असे स्वतः आमदार लांडगे यांनी पत्रकारांना सांगितले. अशाच पध्दतीने मावळ लोकसभेसाठी भाजपने नियुक्त केलेले प्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. ठाकूर यांचे वडिल रामशेठ ठाकूर हे २००४ मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून जिंकले होते. पनवेल महापालिका आणि शहरावर ठाकूर यांच्यामुळे भाजपचे वर्चस्व आजही कायम आहे. संघटन, संपर्क आणि आर्थिकदृष्ट्या ठाकूर हे अत्यंत सक्षम आहेत. यापूर्वी २००९ पासून लोकसभा उमेदवार आणि खासदार घाटाच्या वरचा आहे, आता घाटाखाली संधी मिळावी म्हणून पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची मागणी सुरू आहे. त्यादृष्टीने भाजपसाठी ठाकूर यांच्याइतका प्रभावी आणि दमदार उमेदवार दुसरा नसल्याने विद्यमान खासदार बारणे यांचे टेन्शन वाढले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल आणि चिंचवड विधानसभेचे आमदार भाजपचे आहेत. मावळ तालुक्यात आज राष्ट्रवादीचे आमदार सुनि शेळके असले तरी भाजपचा मोठा पगडा कायम आहे. घाटाखाली कर्जत, उरण आणि घाटाच्या वरती पिंपरी राखीव विधानसभेत शिवसेनेची ताकद आहे. मोदी यांचे नेतृत्व, शिंदे आणि फडणवीस म्हणजेच शिवसेना-भाजपची युती झाल्याने मावळात शिंदे गटाच्या शिवसेनेला पुन्हा संधी मिळेल, असा शिंदे गटाचा दावा आहे. खासदार बारणे हे सलग दोन वेळा मोठअया मताधिक्याने जिंकले आणि विशेष म्हणजे २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचा अत्यंत दारूण पराभव केला आहे.भाजपने लढाईसाठी तयारी सुरू केल्याचे अनेक दाखले देता येतील. गेल्याच आठवड्यात भाजपचे लोकसभा प्रतिनिधी म्हणून प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे येथे मेळावा घेण्यात आला. त्याचवेळी ठाकूर यांच्या संभाव्य उमेदवारीवरही पुसटशे भाष्य झाले. त्याशिवाय २५ जुलै रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत चिंचवडला आहेर गार्डन येथे भाजपचा मोठा मेळावा आयोजित केला आहे. भाजपने या मतदारसंघातही घरोघर संपर्क अभियान, शासन आपल्या दारी अशा विविध योजनांच्या माध्यमातून मतदार गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
दरम्यान, राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सर्व वर्तमानपत्रांत जाहीरात देताना शिंदे हे फडणवीस यांच्यापेक्षा लोकप्रिय असल्याचे दर्शविल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. चूक सुधारण्यासाठी पुन्हा दुसऱ्या दिवशी पूर्ण पान जाहीरात केली, पण शिंदे-फडणवीस यांच्या समर्थकांमधील धुसफूस सुरूच आहे. ठाणे, कल्याण आणि पालघर लोकसभा या शिंदे गटाकडे असताना त्यावर भाजपने हक्क सांगितल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट राजीनाम्याती भाषा केली. तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दूल सत्तार, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड या शिंदे समर्थक मंत्र्यांच्या वाढत्या भ्रष्टाचारामुळे भाजपची नाहक बदनामी होते म्हणून या मंत्र्यांना वगळण्याचे आदेश भाजप नेत्यांनी दिल्याने स्वतः मुख्यमंत्री शिंदे अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत प्रसंगी भाजपला सर्व जागा लढायच्या झाल्यास तयारी पाहिजे म्हणून जिथे शिंदे गटाचे खासदार-आमदार आहेत तिथेही भाजपने जोर लावला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाची एकही सभा झाली नाही, मात्र भाजपने मोहिम हाती घेतल्याने बारणे समर्थक चिंतेत आहेत. दरम्यान, बारणे हेच कदाचित भाजपच्या कमळावर लढतील, अशीही शक्यता भाजपमधून वर्तविली जाते.