मावळात महायुतीत उमेदवारीसाठी मोठी चुरस

0
89
  • सुनील शेळके, बाळा भेगडेंच्या बरोबर आता रविंद्र भेगडे स्पर्धेत

तळेगाव, दि. २७ – मावळ विधानसभा मतदरासंघात महायुतीत उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यात मावळ विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची ताकद अधिक आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या बाळा भेगडे यांच्यानंतर आणखी एक चेहरा सुनील शेळकेंना टफ फाईट देत आहे, तो म्हणजे आप्पा उर्फ रवींद्र भेगडे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मावळचे स्थानिक राजकारण तापायाला सुरुवात झाली आहे. रवी भेगडे हे सुरुवातीपासून भाजपचे एकनिष्ठ नेते. बाळा भेगडे, सुनील शेळके आणि रवी भेगडे हे मावळचे प्रमुख नेते भाजपमध्ये होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून मावळ विधानसभेच्या तिकिटासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स होता. शेवटी बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी सुनील शेळके यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर रवी भेगडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र निवडणुकी अगोदर रवी भेगडे यांची मनधरणी करण्यात भाजपला यश आले होते. रवी भेगडे यांनी बाळा भेगडे यांना जाहीर पाठिंबाही दिला होता. परंतु २०१९ मध्ये वारं फिरलं आणि सुनील शेळके हे राष्ट्रवादीकडून मावळचे आमदार झाले.

यंदाच्या विधनासभा निवडणुकीत हे तीनही नेते महायुतीत आहेत. यात महायुतीचे आमदार म्हणून सुनील शेळके आहेत. त्यांचा दबदबा मतदारसंघावर असला तरी भाजपकडून यंदाच्या निवडणुकीत रवी भेगडे यांनी तयारी सुरु केली आहे. नुकतीच त्यांनी वाढदिवसानिमित्त आमदारकी लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तशी तयारी देखील त्यांनी केली आहे. मात्र सध्या महायुतीचा आमदार असल्याने येणाऱ्या काळात वरिष्ठांकडून हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतो आणि कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणे माहत्वाचे ठरणार आहे.