मावळात आज आदित्य ठाकरे बरसणार, संजोग वाघेरेंसाठी पहिली सभा

0
152

पुणे, दि. १६ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघ ‘राजकारण्यांच्या रेकीमुळे’ विशेष चर्चेत आला आहे. मावळ लोकसभा हा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मतदार संघ आहे. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट मावळ मतदारसंघावर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागलेत. त्यातच अजित पवार यांचे खंदे समर्थक राहिलेले संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर ठाकरेंनी मावळ तालुका संघटकपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली.

वाघेरे यांच्या पक्षप्रवेशानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची सभा मावळ लोकसभा मतदारसंघात पार पडणार आहे. त्यामुळे मावळ लोकसभेवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे आदज पहिलं पाऊल टाकणार आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे हे मावळातील शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर तुटून पडणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेत जाणं पसंत केलं. त्यामुळे मावळसाठी उद्धव ठाकरे गटाने अजितदादांच्या शिलेदाराला हेरले आणि त्यांच्यावरच मावळ लोकसभेची जबाबदारी सोपवली. लोकसभेची उमेदवारी मिळेल, याचं आश्वासन घेऊनच वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे येणाऱ्या काळात श्रीरंग बारणे यांना संजोग वाघेरे पाटील यांच्याशी सामना करावा लागू शकतो. संजोग वाघिरे यांच्या येण्याने उद्धव ठाकरे गट चांगलाच अॅक्टिव्ह झाला असून मावळसाठी आदित्य ठाकरे हे पहिली सभा घेणार आहेत.