पिंपरी, दि. २३ जून (पीसीबी) – दिव्यांगांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून मावळ तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना साहित्य वाटले आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणारी सायकल, अंधांसाठी काठी, कर्णबधिर व्यक्तींसाठी कानाचे मशीन, व्हील चेअर, टॉयलेट भांडे, वॉकर आणि इतर साहित्य वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साहित्य वाटपास सुरुवात केली होती. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगांना साहित्याचे वाटप करण्यात आले. वडगाव येथे दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा खासदार बारणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मावळ तालुक्यातील प्रत्येक शाळेतील पहिले तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
खासदार बारणे म्हणाले, दिव्यांग बांधवांना केंद्र सरकारच्या योजनेतून साहित्य वाटप करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबविली जाते आहे. मतदारसंघातील २७१ लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग महामंडळाची स्थापना केली आहे. दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी चिकाटी ठेवून मेहनत करा
गुणवंत विद्यार्थी शेतकरी, कामगारांची मुले आहेत. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मेहनत, चिकाटी, कष्ट करणे आवश्यक आहे. अभ्यासाचा स्तर वाढला असून गुणांचा टक्काही वाढला आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे. आई-वडील मोठ्या खस्ता खावून मोठ्या परिश्रमाने शिकवत आहेत. त्यांच्या घामामुळे, कष्टामुळेच तुम्ही शिक्षण घेत आहात. उच्च शिक्षण घेवून नोकरीला लागल्यानंतर त्यांना विसरु नका असे मार्गदर्शन खासदार बारणे यांनी विद्यार्थ्यांना केले.