मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा संसद उत्कृष्टरत्न पुरस्काराने गौरव

0
193

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींकडून सन्मान

पिंपरी, दि. १8 (पीसीबी) – लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्टरत्न पुरस्काराने दिल्लीत गौरविण्यात आले. हे केवळ मावळच्या जनतेमुळे शक्य झाले. त्यामुळे हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया खासदार बारणे यांनी दिली. दरम्यान, पुरस्कार मिळाल्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही खासदार बारणे यांचा सत्कार केला.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. तेलंगनाच्या राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते खासदार बारणे यांना 17 व्या लोकसभेतील कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा, निवृत्त न्यायाधीश संजयकुमार कौल, प्राईम पॉईंट फौंडेशनचे श्रीनिवासन, प्रियदर्शनी राहुल उपस्थित होते.

चालू 17 व्या लोकसभेत खासदार बारणे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम आहे. त्यांनी 635 प्रश्न विचारले आहेत. 166 चर्चामध्ये सहभाग घेतला तर, 13 खासगी विधेयके मांडली आहेत. खासदार बारणे यांची सभागृहात 94 टक्के उपस्थिती आहे. या कामगिरीसाठी त्यांना संसद उत्कृष्टरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तर, याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सलग पाच वेळा प्रदान करण्यात आला आहे. महासंसद रत्न पुरस्कार, विशिष्ट संसदरत्न पुरस्कार एकवेळा मिळाला. आता विशिष्ट संसदरत्न पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. संसदेतील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी आणि त्याच वेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी जनहिताची केलेली कामे यांचा या पुरस्कार निवडीसाठी विचार करण्यात आला आहे.

लोकांमधील खासदार संसदेत उपस्थित राहणे, मतदारसंघातील प्रश्नांवर आवाज उठविण्याबरोबरच लोकांमध्ये मिसळणे, चोवीस तास उपलब्ध असणारे खासदार अशी श्रीरंग बारणे यांची ओळख आहे. नम्र, सतत लोकांना भेटणे, त्यांच्या अडी-अडचणींना धावून जाणे, सुख, दु:खात सहभागी होतात. दोन जिल्ह्याला जोडणारा मतदारसंघ असतानाही खासदार बारणे हे सातत्याने मतदारसंघात असतात. त्यामुळे लोकांमधील खासदार अशी बारणे यांची मतदारसंघात ओळख आहे.

संसदेतील भाषणांबरोबच जमिनीवरही काम

खासदार बारणे यांनी केवळ संसदेत आवाज उठविला नाही. तर, प्रत्यक्षात जमिनीवर काम देखील केले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मावळमधील आदिवासी पाडे, वाड्या वस्त्यांवर वीज, रस्त्यांची सुविधा निर्माण केली. गावा-गावांमधील अंतर्गत रस्ते, पाण्याची सुविधा सक्षम केली. स्व:खर्चाने पवना धरणातील गाळ काढून पिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्याची सोय केली. पिंपरीत पासपोर्टचे कार्यालय सुरु केले. क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या नावाने टपाल तिकीटाचे प्रकाशन केले. भारत सरकारच्या हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच.ए.) कंपनीला आर्थिक मदत मिळवून दिली. पवना, इंद्रायणी नदी सुधारच्या प्रकल्पाला गती दिली आहे. रेल्वेचे जाळे विस्तारले जात आहे. पनवेल ते उरण लोकल सेवा चालू केली. पनवेल ते कर्जत या रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजने अंतर्गत समावेश रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे. लोणावळा ते पुणे या दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. नवीन विमानतळाला गती दिली आहे. अटल सेतू महामार्ग 70 टक्के मावळमधील उरण विधानसभा मतदारसंघातून जात आहे. तो मार्ग सुरु झाला. माथेरानला बंद पडलेली ट्रायटेन रेल्वेची सेवा सुरु केली. खंडाळा घाटातील अंतर कमी करण्यासाठी मिसिंग लिंकच्या कामाला गती देण्याचे काम केले. संसदेतील भाषणांबरोबरच जमिनीवरही खासदार बारणे यांनी काम केले आहे.

लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान

खासदार श्रीरंग बारणे हे 20 वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक होते. नगरसेवक म्हणून काम केल्याचा फायदा त्यांना संसदेतील कामात झाला. प्रश्न विचाराने, चर्चेत सहभागी होणे, खासगी विधेयके सादर करणे, सभागृहातील 100 टक्के उपस्थिती या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे खासदार श्रीरंग बारणे यांना लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान देखील मिळाला आहे.

मावळच्या जनतेला पुरस्कार अर्पण

दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने दोनवेळा माझ्यावर विश्वास टाकला. मोठ्या मताधिक्याने लोकसभेत निवडून पाठविले, त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. हा पुरस्कार म्हणजे मावळवासीयांसाठी करत असलेल्या कामाला मिळालेली पावती आहे. हा पुरस्कार माझा नसून मतदारसंघातील जनतेचा आहे. त्यांच्यामुळेच मी हे काम करु
शकलो. त्यामुळे ही हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.