मावळचा निकाल उद्योगनगरीवर, लोकसभेसाठी चिंचवड, पिंपरी मिळून दहा लाख मतदार

0
171

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – पिंपरी-चिंचवड शहर हे मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात विभागले गेले आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघात २५ एप्रिल २०२४ पर्यंत झालेल्या मतदार नावनोंदणी मोहिमेत तब्बल ४७ हजार २९५ मतदारांची भर पडली आहे. शहरातील तब्बल १५ लाख ४३ हजार २७५ मतदार १३ मे रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. २३ जानेवारी २०२४ पर्यंत झालेल्या नाव नोंदणी अभियानात पिंपरी विधानसभेत ३ लाख ६४ हजार ८०६ मतदार होते. २५ एप्रिल २०२४ पर्यंतच्या नोंदणी अभियानात मतदार संख्या वाढून ३ लाख ७३ हजार ४४८ इतकी झाली आहे. पुरुष मतदार ४ हजार २२४ ने आणि महिला मतदार ४ हजार ४१६ ने वाढले आहेत, तर तृतीयपंथी दोन मतदार वाढले आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५ लाख ९५ हजार ४०८ मतदार होते. २५ एप्रिल २०२४ पर्यंत मतदार संख्येत तब्बल २२ हजार ८३७ ने बाद झाली आहे. आता एकूण मतदार संख्या ६ लाख १८ हजार २४५ इतकी झाली आहे. ती पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्या आहे. पुरुष मतदार ११ हजार ८०९ ने आणि महिला मतदार ११ हजार २४ ने वाढले आहेत. तर, तृतीयपंथी मतदारसंख्या ४ ने वाढली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघात २३ जानेवारी २०२४ पर्यंत ५ लाख ३५ हजार ६६६ मतदार होते. त्यात १५ हजार ९१६ ने वाढ होऊन एकूण मतदार संख्या ५ लाख ५१ हजार ५८२ इतकी झाली आहे. पुरुष मतदारांची संख्या ८ हजार २७३ ने आणि महिला मतदारांची संख्या ७ हजार ६४४ ने वाढली आहे. तर, तृतीयपंथी मतदारांची संख्या एकने वाढली आहे.

निवडणूक आयोगाने २३ जानेवारी ते २५ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून मतदार नोंदणी अभियान राबवले. नोंदणी झालेल्या नवमतदारांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे. त्यासाठी साहाय्यकारी मतदान केंद्र बनविण्यात येणार आहेत. त्या नव्या मतदारांची नावे पुरवणी यादीत येणार आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.