माळशेज घाटातील दरीत उडी घेत एसटी कंडक्टरची आत्महत्या

0
402

ठाणे, दि. ९ (पीसीबी) : कल्याण – नगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात एका एसटी वाहकाने दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज घडली असून याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान आत्महत्या का केली याचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आत्महत्या केलेल्या एसटी वाहकाचे नाव गणपत इडे असून तो भंडारदरा येथे कुटूंबासह राहत होता. आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये.

कल्याण ते अकोले ही अकोले येथील एसटी आगराची बस आज दुपारच्या सुमारास कल्याणहून नगर जिल्ह्यातील अकोले बस आगरमध्ये निघाली होती. मात्र, आज दुपारच्या सुमारास एसटी बस माळशेज घाट चढत असतानाच वाहक गणपत यांनी अचानक घाटातून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी दरीत वाहकाचा मृतदेह शोधून काढला आणि तपासणीसाठी मुरबाड मधील शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे.

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

मात्र, वाहक गणपत यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलून का आत्महत्या केली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. दरम्यान या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.