मालमत्ताधारकांसाठी आता 24 तास हेल्पलाईन

0
212

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील पावणेसहा मालमत्ताधारकांना मालमत्तांची आकारणी, बिल क्रमांक, सवलती, भरणा पद्धत याविषयी माहिती मिळावी, यासाठी महापालिका करसंकलन विभागामार्फत 24 तास हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यात येणार आहे. सारथी हेल्पलाईनचे कामकाज करणाऱ्या संस्थेलाच एक वर्षे कालावधीसाठी करारनामा न करता थेट पद्धतीने हे कामकाज देण्यात येणार आहे.

पिंपरी -चिंचवड महापालिका करआकारणी व करसंकलन विभागामार्फत शहरातील इमारत व जमिनींवर मालमत्ताकराची आकारणी व वसुली करण्याची कार्यवाही करण्यात येते. करआकारणी व करवसुलीचे कामकाज करसंकलन मुख्य कार्यालय व 17 करसंकलन विभागीय कार्यालयामार्फत चालते. 1 जुलै 2022 अखेर करसंकलन विभागाकडे शहरातील 5 लाख 78 हजार 154  मालमत्तांची नोंद झाली आहे. पुढील कालावधीत अंदाजे एक लाख मालमत्तांची वाढ होणे अपेक्षित आहे.

मालमत्ताधारकांमार्फत वारंवार त्यांच्या मालमत्तांची केलेली आकारणी, मालमत्ता करांचे बिल क्रमांक, विभागीय कार्यालय, मालमत्ताकरात देण्यात येणाऱ्या सवलती, मालमत्ताकराची भरणा पद्धत याबाबत चौकशी करण्यात येते. त्यासाठी करसंकलन विभागाकरिता एक वर्ष कालावधीसाठी 24 तास हेल्पलाईन सुविधा सुरू करण्यासाठी 20 जुलै 2022 रोजीच्या प्रस्तावानुसार मान्यता देण्यात आली आहे.

या हेल्पलाईनसाठी प्रतिकॉल ऑपरेटर 24 हजार 695 या दराने एकूण चार कॉल ऑपरेटरकरिता प्रतिमहिना 98 हजार 780 रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, एक वर्ष कालावधीसाठी 11 लाख 85 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या महापालिकेचे सारथी हेल्पलाईनचे कामकाज टेक नाईन सर्व्हिसेस या संस्थेकडून केले जात आहे. करसंकलन विभागाच्या हेल्पलाईनचे कामकाजही टेक नाईन सर्व्हिसेस यांच्यामार्फत करारनामा न करता थेट पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी 11 लाख 85 हजार रुपये खर्च होणार आहे.