मालमत्ताकराचे बिले न मिळाल्याच्या लेखी तक्रारी नाहीत, दुबार बिले देणार

0
180

पिंपरी दि. १३ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना घरपोच मालमत्ताकराची बिले पोस्ट कार्यालयामार्फत पाठविण्यात आली आहेत. काही नागरिकांना ती मिळाली नसल्याच्या तोंडी तक्रारी येत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार त्यांना विनामुल्य दुबार बिले पालिकेच्या 17 विभागीय कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पुढील आठवड्यात पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजनही करण्यात आल्याचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

पिंपरी महापालिकेच्या विभागीय कर संकलन कार्यालयाच्या वतीने दरवर्षी मालमत्ताकराची बिले घरोघरी वाटप केली जातात. मात्र, छपाई आणि वितरण व्यवस्थेच्या दिरंगाईमुळे अनेकांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात बिले मिळतात. त्यामुळे नागरिक बिले भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र होते. तथाति, कर भरण्यासही विलंब होत होता. त्यामुळे सन 2022-23 वर्षापासून बिले पोस्टाने घरोघरी वाटण्याचा निर्णय कर संकलन विभागाने घेतला. शहरात एकूण 5 लाख 77 हजार मालमत्ताधारकांची नोंद आहे. महापालिकेने बिले छापून घेऊन ती पोस्टाला उपलब्ध करून दिली. शहरातील नागरिकांना मालमत्ताकराची बिले मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाटण्यात आली आहेत. शहरातील काही भागात अद्याप बिलच मिळाले नसल्याच्या तोंडी तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. मात्र, पोस्टाने ज्या मालमत्ता धारकांचा पत्ता सापडणार नाही, अशी बिले विभागीय कार्यालयाकडे जमा केली जातील, असे सांगितले होते.

याबाबत माहिती देताना सहायक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, कर संकलन विभागाची शहरात 17 विभागीय कार्यालय आहेत. यापैकी पत्ते न मिळाल्यामुळे 2200 बिले पोस्टाने वाकड कार्यालयामध्ये जमा केली आहेत. त्यानंतरही काही भागात पत्या अभावी मिळकत धारकांना बिल मिळाली नसेल तर पुढील आठवड्यात पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ सविस्तर माहिती घेण्यात येईल. ज्या परिसरात पत्ते दुरुस्त करायची असतील तेथे पालिकेच्या गटलिपिकामार्फत पत्ते दुरूस्ती करण्यासाठी तातडीने विशेष मोहिम राबवून तीन महिन्यात पत्ते दुरुस्त करण्यात येतील.

महापालिकेच्या संकेतस्थळावर फॉर्म भरण्याचे आवाहन
शहरातील मालमत्ता धारकांना दरवर्षी बिले वेळेत मिळावी, यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करत आहे. यापुढील काळात महापालिकेचा एसएमएस, ई- मेलवर बिल पाठविण्याचा मानस आहे. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर ‘केवायसी फॉर्म’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फॉर्म मिळकत धारकाने भरावा. यामध्ये मालमत्ता क्रमांक, नाव, सविस्तर पत्ता, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भरणे गरजेचे आहे. जेणेकरून दरवर्षी नवीन आर्थिक वर्षांत मालमत्ता धारकांना ऑनलाईन बिले पाठविणे आणि मालमत्ता धारकांना ऑनलाईन बिल भरणे सोईस्कर होणार असल्याचे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले.