नवी दिल्ली, दि. २8 (पीसीबी)
मोटर वाहन उद्योगाला नवीन दिशा देणाऱ्या आणि मध्यमर्गीयांच्या चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ओसामु सुझुकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांना लिम्फोमा नावाच्या आजाराने ग्रासले होते. बुधवार, २५ डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनतर्फे देण्यात आली.
ओसामू सुझुकी हे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मानद अध्यक्ष होते. १९८१ मध्ये मारुती उद्याोग लिमिटेडबरोबर संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी तत्कालीन भारत सरकारबरोबर भागीदारी करण्याचा धाडसी निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व, अशी सुझुकी यांची ओळख आहे. तत्कालीन काळात परवाना व्यवस्थेअंतर्गत भारत ही एक बंद अर्थव्यवस्था होती. तेव्हा सुझुकी यांना देशातील मोटर वाहन उद्याोगाला चालना तथा नवीन दिशा देणारे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. २००७ मध्ये सरकारने सुझुकी मोटर कॉर्पोरेशनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मारुती उद्याोग लिमिटेडनंतर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड म्हणून नावारूपाला आली.