दि.१४ (पीसीबी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणावरुन सूरज चव्हाण यांच्यावर चौफेर टीका झाली होती. सूरच चव्हाण यांनी पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांसह छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अमानुष मारहाण केली होती. या घटनेनंतर सूरच चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच ते काही दिवस फरार देखील होते. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरच चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. कायद्याला हातात घेणाऱ्यांवर कोणतीही हयगय केली जाणार नाही, असा संदेश देणाऱ्या अजित पवार यांच्याच पक्षाने लगेच काही दिवसांत सूरज चव्हाण यांना आपल्या पक्षात स्थान दिलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुकपेजवर याबाबत फोटो पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे. तसेच सूरच चव्हाण यांना आगामी कारकीर्दीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. “महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी मा. श्री. सूरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मा. चव्हाण यांना शुभेच्छा”, असं राष्ट्रवादीच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.