मारकडवाडी प्रकरणात आमदार उत्तमराव जानकर राजीनामा देणार

0
6

सोलापूर, दि. 18 –
ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर 23 जानेवारी रोजी दिल्लीला मुख्य निवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा सादर करणार आहेत. माळशिरस येथील पोटनिवडणूक तातडीने जाहीर करावी. ही निवडणूक बॅलेट पेपरवर किंवा व्हीव्हीपॅट दिसेल अशा पद्धतीने घेण्याची मागणी त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात केली आहे.

23 जानेवारी रोजी मुख्य निवडणूक आयोगाला मारकडवाडी आणि धानोरे या दोन गावातील लोकांची प्रतिज्ञापत्र सादर केली जाणार आहेत. याच दिवशी जर मुख्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर न केल्यास आमदार उत्तमराव जानकर व माजी आमदार बच्चू कडू दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलनास बसणार आहेत.

माळशिरस तालुक्यातील धानोरे या गावी काल हात वर करून झाले मतदान
माळशिरसमधील बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा मुद्दा आता दिल्लीतील जंतर मंतरवर गाजणार आहे. आमदार उत्तम जानकर यांनी पदाचा राजीनामा देऊन माळशिरसमध्ये पोटनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी आणि धानोरे गावातील मतदारांनी ग्रामसभा घेऊन स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार केली आहेत. या दोन्ही गावातील मतदारांचे प्रतिज्ञापत्र मुख्य निवडणूक आयुक्तांना सादर केले जाणार आहेत. त्यात त्यांनी पुन्हा मॉक पोलसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. नुकतेच धानोरेमधील मतदारांनी हात वर करून मतदान केले आहे. त्यात 1206 मतदारांनी हात वर केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष 963 मते मिळाली होती.

बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी मान्य झाली नाही तर…
जर मॉक पोलसाठी परवानगी मिळणार नसेल तर आमदार उत्तम जानकर हे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या अटीवर आमदारकीचा राजीनामा मुख्य निवडणूक आयुक्त यांना देणार आहेत. जर मागणी मान्य नाही झाली तर 23 जानेवारीपासून दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरू करण्याचा इशारा आमदार जानकर यांनी दिला आहे.

माळशिरस मतदारसंघात शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा सामना झाला होता. यामध्ये जानकर यांनी बाजी मारली होती. त्यानंतर मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान करण्यात यावे यासाठी या गावाने 29 नोव्हेंबर पासून आंदोलनाला सुरुवात केली होती. मारकडवाडी येथे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना गावात कमी मते मिळाल्याचे समोर आले. यावर जानकर गटाने आक्षेप घेतला होता. याचवेळी विरोधी भाजपच्या समर्थक ग्रामस्थांनी या बॅलेट वरील मतदानावर बहिष्कार टाकल्याने याबाबत गावात उघड दोन गट पडले, त्यानंतर मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावी, अशा मागणी केली जाऊ लागली. मात्र, प्रशासनाच्या विरोधानंतर या गावात बॅलेट पेपरवर मतदान झाले नाही. मात्र, उत्तमराव जानकर यांनी वारंवार बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे.