मायावतींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करा

0
213

लखनौ, दि. ३१ (पीसीबी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे. निवडणुकीत यश मिळविण्यासाठी अनेक पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. विरोधकांना या वेळी भाजपाचा विजयरथ रोखायचा आहे. त्यासाठी विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उत्तर प्रदेशमधील ‘सुहेलदेव भारतीय समाज पक्षा’चे (सुभासप) अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी गुरुवारी (दि. ३० मार्च) सांगितले की, विरोधकांनी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे. भारताला आजवर खुल्या आणि मागास प्रवर्गातले पंतप्रधान मिळाले आहेत, पण अद्याप दलित पंतप्रधान लाभलेला नाही. तसेच आपला जुना सहकारी समाजवादी पार्टीवरदेखील राजभर यांनी अनेक आरोप केले. अखिलेश यादव हे भाजपाला मदत करत आहेत. भाजपाच्या विरोधात ते बसपा, काँग्रेस आणि सुभासपसारख्या पक्षांची आघाडी का नाही करत? असाही प्रश्न राजभर यांनी उपस्थित केला.

उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील झहुराबाद मतदारसंघाचे आमदार असलेल्या ओमप्रकाश राजभर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले, “खुल्या प्रवर्गातील अनेक लोक पंतप्रधानपदी बसले आणि आता तर मागास प्रवर्गातील व्यक्तीकडेही पंतप्रधानपद आहे. दलित प्रवर्गातून एकही व्यक्ती पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे आता विरोधक दलित चेहरा पुढे का करत नाहीत? मायावती यांच्यापेक्षा एकही मोठा दलित नेता सध्या भारतात नाही.”