मायटेक्स एक्स्पोला शनिवारी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत भेट देणार

0
201

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची माहिती

पुणे दि. २७ (पीसीबी) – महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र शासन उद्योग विभाग आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड मायटेक्स एक्स्पो या भव्य प्रदर्शनाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत शनिवारी (दि. २८) सकाळी साडे अकराच्या दरम्यान भेट देणार आहेत, ही माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे आणि उद्योगमंत्री उदय सामंत काही उद्योजकांसोबत संवाद साधून प्रदर्शनातील काही स्टॉलला भेट देणार आहेत. शिवाजीनगरातील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य प्रदर्शन सुरु असून दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत अशी वेळ आहे. गुजरात सरकारचा औदयोगिक विस्तार कुटीर आणि ग्रामीण उद्योग, भारत सरकारच्या वस्त्र आणि हस्तशिल्प विभाग, भारत सरकारचा राष्ट्रीय ज्युट बोर्ड, राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, स्टेट बँक ऑफ इंडिया, एक्स्पो इंडिया एक्झीबिशन प्रायव्हेट लिमिटेड हे एक्स्पोचे सहप्रायोजक आहेत.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर व्यापारी आणि उद्योजकांसाठी कार्यरत आहे. मायटेक्सच्या माध्यमातून राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राला चालना देणे, प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योजक व्यापारी आणि विशेषतः नवउद्योजकांच्या नवीन उत्पादनांना चालना देण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने मायटेक्स भरविले असल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, महाराष्ट्र चेंबरचे मायटेक्सचे पुणे विभागाचे मुख्य संयोजक दिलीप गुप्ता, विजयकुमार मालपुरे, गोविंद पानसरे, शामला देसाई, सूरज तामगावे, मनीष पाटील, महाराष्ट्र चेंबरचे सेक्रेटरी जनरल सागर नागरे आदी संयोजन करत आहेत.

काय आहे प्रदर्शनात
महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, लेह, लडाखसह एकूण आठ राज्यातील व देशातील व्यापारी, उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झाले असून प्रदर्शनात ३२५ हून अधिक जणांचे स्टॉल आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कंपन्यांची उत्पादने, नवोदित उद्योजकांची उत्पादने पाहण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. पदार्थां पासून ते कृषी, पर्यटन, गृहोपयोगी वस्तूंचे दर्शन घडविणारी उत्पादने प्रदर्शनात आहेत. प्रदर्शनात व्यापार, उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योजक, बांधकाम, आयटी, शिक्षण ऑटोमोबाईल, गृहप्रकल्प, सोलार क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील उद्योजकांचा यामध्ये सहभाग आहे.