मानवी वस्तीत धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तिघांना अटक

0
220

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मानवी वस्तीत धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तिघांना अटक केली. दोन्ही कारवायांमध्ये दीड लाख रुपये किमतीचे 72 सिलेंडर जप्त केले आहेत.

पहिल्या कारवाईमध्ये वाकड परिसरात बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर मधून गॅस धोकादायकपणे काढून घेतला जात असल्याची माहित मिळाल्यानंतर पोलिसांनी विष्णु ज्योतीराम सुतार (वय 24, रा. थेरगाव, पुणे. मूळ रा. लातूर), अतुल श्रीहरी पांचाळ (वय 25, रा. थेरगाव, पुणे. मूळ रा. लातूर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 78 हजार 700 रुपये किमतीचे गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य जप्त केले.

दुसरी कारवाई देखील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथे करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांनी जयराम सर्जेराव चौधरी (वय 22, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी, पुणे. मूळ रा. परभणी) याला अटक केली. त्याच्याकडून 71 हजार 525 रुपये किमतीचे गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दोन्ही कारवायांमध्ये एक लाख 50 हजार 225 रुपये किमतीचे 43 घरगुती वापराचे विविध कंपनीचे सिलेंडर, 3 व्यवसायिक वापराचे सिलेंडर, 26 लहान चार कीलोचे सिलेंडर असे 72 विविध कंपनीचे सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार देवा राऊत, जयवंत राऊत, संतोष इंगळे, सागर अवसरे यांनी केली आहे.