माथेरानच्या पर्यटन विकासाला मोदी सरकारमुळे चालना – खासदार बारणे

0
120
  • बंद पडलेली माथेरान टॉय ट्रेन पुन्हा सुरू करण्यासाठी दिला 150 कोटींचा निधी – बारणे

माथेरान, दि. 4 मे – माथेरान येथील पर्यटन विकासाला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमुळे मोठी चालना मिळाली आहे. यापुढेही माथेरानच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीच्या वतीने माथेरान येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना संपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख संभाजी जगताप आदी पदाधिकारी होते.

खासदार बारणे म्हणाले की, माथेरान हे जागतिक कीर्तीचे थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरानची पूर्ण अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे माथेरानमधील पर्यटन विकासाला मोदी सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेली टॉय ट्रेन बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आपण पाठपुरावा करून केंद्र शासनाकडून दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ही ट्रेन पुन्हा नव्या दिमाखात पर्यटकांच्या सेवेत रुजू झाली आहे. माथेरानला येणाऱ्या दहा लाख पर्यटकांपैकी पाच लाख पर्यटक या टॉय ट्रेन सुविधेचा लाभ घेत आहेत.

पूर्वी माथेरानमध्ये रिक्षा माणसांना ओढाव्या लागायच्या. त्या ठिकाणी आता ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. पर्यटकांसाठी अनेक अत्याधुनिक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती बारणे यांनी दिली.

केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून माथेरानच्या विकासासाठी यापुढेही अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

माथेरानमधील रहिवासी आणि व्यावसायिक यांनी खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार केला. निवडणुकीत बारणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.