मातृशक्तीच्या कर्तृत्वाला,नेतृत्वाला, मानवंदना

0
178

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि जिजाऊ मातृशक्ती महिला विभागातर्फे थेरगाव येथील खिंवसरा – पाटील शिक्षण संकुलामध्ये शनिवार, दिनांक ०९ मार्च २०२४ रोजी महिलादिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविणार्‍या महिलांचा सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. तसेच पालक निबंधस्पर्धा आणि पाककृती स्पर्धा बक्षीस वितरण आणि महिला पालक संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजक विजया मानमोडे, माजी नगरसेविका उषा मुंढे, माजी विद्यार्थिनी लक्ष्मी मोरे, जिजाऊ मातृशक्तीच्या सदस्या प्रणिता वालावलकर, शास्रज्ञ अंकिता नगरकर, बचतगट मार्गदर्शिका साधना मांडे, मुखई गाव सरपंच संयोगिता पलांडे, आत्मजा फाउंडेशनच्या अधिकारी ऐश्वर्या बिराजदार, प्रियदर्शिनी गुरव अशा मान्यवर महिलांचा सन्मान क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष डाॅ.अशोक नगरकर आणि संचालक सदस्य शाहीर आसराम कसबे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच शाळेच्या स्वच्छतेत महत्त्वाचा हातभार लावणार्‍या शिक्षकेतर कर्मचारी आशा थोरात, अर्चना धावारे, नीता धावारे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सुरेश मानमोडे, मुख्याध्यापक नटराज जगताप, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बालविभाग प्रमुख आशा हुले, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सन्मानाला प्रतिसाद देताना प्रत्येकाने कोणतेही काम आत्मविश्वासपूर्वक करा, संकटांनी कधीही खचून न जाता आपल्यामधील चांगल्या गुणांचा शोध घेऊन वाटचाल करा, एक उत्तम माणूस म्हणून आनंदाने जगा, आपल्या पाल्यांवर उत्तम संस्कार करताना त्यांच्यामध्ये संशोधनवृत्ती निर्माण करा असे अनेक कानमंत्र व्यासपीठावरील सन्मानार्थी महिलांनी पालकांना दिले; तसेच स्वतःचा जीवनप्रवास कथन करीत विद्यार्थिनींशी सुसंवाद साधला.

पालक स्पर्धेचा निकाल सहशिक्षिका मीना जाधव यांनी सांगितला. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी आणि सहभागी पालकांचा गौरव करण्यात आला.

इयत्ता ५वी मधील भूमिका खंडागळे हिने राजमाता जिजाऊ यांचे आत्मकथनपर मनोगत व्यक्त केले. तसेच इ.८वी मधील अक्षदा गोरे या विद्यार्थिनीने महिलादिनाचे विशेष महत्त्व सांगितले.

सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार आणि शिवाजी पोळ यांनी गाण्यातून मातृशक्तीला अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचा परिचय सहशिक्षिका वीणा तांबे यांनी करून दिला. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. नटराज जगताप यांनी आभार मानले.