पिंपरी, दि.५ (पीसीबी) “भूमी, डोंगर, जंगल, नदी आणि संत हे पाच घटक निरपेक्षपणे मानवजातीला देण्याचे काम करतात. त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी पर्यावरणदिनाने दिली आहे म्हणून वृक्षारोपण करून मातीशी नाते जपू या!” असे विचार आपला परिवार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष एस. आर. शिंदे यांनी रविवार, दिनांक ०५ जून २०२२ रोजी गोलांडे इस्टेट परिसर, चिंचवड येथे व्यक्त केले. जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून आनंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि गोलांडे इस्टेट मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरातील शंभर कुटुंबीयांचे अभियान चालविणारे एस. आर. शिंदे आणि दहा वर्षांपासून वृक्षांची एखाद्या लहान बालकाप्रमाणे जोपासना करणारे ज्येष्ठ वृक्षप्रेमी सखाराम पाटील यांचा ‘पर्यावरणमित्र सन्मान’ प्रदान करून गौरव करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिका नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याध्यक्ष प्रिया जोशी, रवींद्र झेंडे, गोलांडे इस्टेट मित्रपरिवाराचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा!’ , ‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा!’ अशा घोषणा देत वड, पिंपळ, कांचन या देशी रोपांचे वृक्षारोपण केले. राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविकातून, “दहा वर्षांपासून या परिसरात देशी रोपांचे वृक्षारोपण करण्यात येत आहे. बऱ्याच वेळा उत्साहाने वृक्षारोपण केले जाते; पण नंतर त्याची देखभाल केली जात नाही. मात्र, दहा वर्षांपूर्वी लावलेली रोपे आता उत्तम प्रकारे बहरल्याने पक्ष्यांचा अधिवास वाढला आहे. कोविड काळात प्राणवायूच्या अभावी अनेकांनी प्राण गमावले. या पार्श्वभूमीवर झाडांच्या सहवासात परिसरातील नागरिक सावली अन् प्राणवायूची अनुभूती घेत आहेत!” अशा भावना व्यक्त केल्या. प्रिया जोशी यांनी, “स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्याला सावली देणारे वृक्ष हे सत्पुरुष असतात, असे एका संस्कृत सुभाषितात सांगितले आहे!” असे मत व्यक्त केले. आपला परिवार फाउंडेशनचे बाळासाहेब राठोड यांनी जागतिक पर्यावरणदिनाचा इतिहास कथन केला; तर आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या माधव जोशी यांनी भारतातील पर्यावरण जागृती चळवळींची माहिती दिली. एस. आर. शिंदे पुढे म्हणाले की, “एक माणूस शंभर पावले चालला तर ती कृती होते; पण शंभर माणसांनी एक पाऊल टाकले तर ते अभियान असते. त्यामुळे भंडारा डोंगराच्या पायथ्याशी आपला परिवाराच्या शंभर कुटुंबीयांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प हाती घेतला. सूर्य उगवल्यावर दिवस सुरू होतो; परंतु एक झाड लावल्याने दिवस आनंदात जातो. भारतीय नागरिकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक वृक्ष लावण्यास एकशेतीस कोटी वृक्षांचे रोपण होईल!” आनंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि गोलांडे इस्टेट मित्रपरिवाराचे सदस्य यांनी संयोजनात सहकार्य केले. महेश गावडे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.