पिंपरी, दि. २४ – पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामागील जागा त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्या राखीव जागेवर महापालिकेने नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्याबाबतचा बोर्ड लावल्याने आंबेडकरी जनतेत संतापाची लाट निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले. याबाबत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती, पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आह़े.
यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे बाळासाहेब रोकडे, बापूसाहेब गायकवाड, तुकाराम गायकवाड, विनोद गायकवाड, राजेंद्र साळवे, संतोष जोगदंड, राजू गायकवाड, दत्ता ठाणांबीर, प्रमोद शेरे, मुकुंद रणदिवे, रामभाऊ ठोके, नारायण म्हस्के, संजय ठोंबरे, बाबासाहेब वाघमारे आदी उपस्थित होते.
पिंपरी येथील भीमसृष्टी मागील जागेत त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारक व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासुन सुरू आहे. त्याबाबत आंबेडकरी जनतेच्या वतीने अनेकवेळा आंदोलनं, मोर्चे, उपोषणं करण्यात आले. वेळोवेळी महापालिका आणि राज्यशासनाला त्याबाबत पत्रव्यवहार देखील करण्यात आले आहे. परिणामी नागरिकांच्या मागणीस अनुसरून उपलब्ध जागा माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राखीव करण्याबाबतचा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेत एकमताने पारित करण्यात आला होता. तसेच स्मारक उभारण्यासाठी निधी देखील महापालिकेच्या वतीने मंजूर करण्यात आला आहे. ही जागा पीएमपीएमएल कडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतची प्रक्रिया देखील पार पडली आहे. स्मारकासाठी आवश्यक असणार्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत. असे असताना याठिकाणी स्मारकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल अशी अपेक्षा आंबेडकरी जनतेच्या वतीने व्यक्त करण्यात येत होती.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेने नव्याने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप विकास आखाड्यात स्मारकासाठी राखीव असलेल्या जागेवर पुन्हा आरक्षण टाकल्याने शहरातील आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. परिणामी नागरिकांच्या वतीने आंदोलनं आणि उपोषण करण्यात आले. तसेच दहा हजारांहून अधिक नागरिकांकडून त्याबाबत महापालिकेकडे लेखी हरकती देखील नोंदविण्यात आल्या आहेत. याविषयी सुनावणी होणे अपेक्षित असताना महापालिकेने आरक्षित जागेवर नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्याबाबतचा बोर्ड लावल्याने महापालिकेच्या विरोधात आंबेडकरी जनतेत संतापाची लाट निर्माण झाली असून संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर नियोजित जागेवर टाकण्यात आलेल्या आरक्षणावरील हरकतींवर जोपर्यंत सुनावणी होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारचे बोर्ड, फ्लेक्स लावू नये अथवा कोणतेही कामकाज केले जाऊ नये, अशा आशयाचे निवेदन महापालिका आयुक्तांना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती, पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने देण्यात आले आहे.
“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच शहराचा प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीमसृष्टी यामागील मोकळी जागा ही माता रमाई स्मारकासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे असा महापालिकेने त्या ठिकाणी बोर्ड लावलेला असतानाही महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आरोग्य मंदिराचे काम या ठिकाणी चालू होणार आहे असा खोडसाळ प्रचार करणारा बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आला त्याचा निषेध विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला व महापालिकेतील वैद्यकीय पदाधिकाऱ्यांना जाब विचारून तो बोर्ड काढण्यास भाग पाडले. पुन्हा असा प्रकार घडल्यास महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल” बाळासाहेब रोकडे यांनी म्हटले आहे.