माण ग्रामस्थांचा निर्णय, आयटी पार्कला गावाचे नाव द्या

0
3

माण, दि. ६ (पीसीबी) – हिंजवडी आय. टी. पार्क मध्ये उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार येऊन गेल्यानंतर मागील काही दिवसापासून ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. आज मात्र हिंजवडी जवळील माण मधील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेतली. यादरम्यान सभेमध्ये आय. टी. पार्कला आपलं नाव न दिल्याचे सांगत या नंतर कुठलीही जमीन देणार नसल्याची भूमिका व निर्णय गावकऱ्यांनी घेतल्याचे सांगितले.

या निर्णयासोबतच ‘वेळ पडली तर अंगावर गोळ्या झेलू पण आय टी पार्क साठी जागा देणार नाही’ असे देखील जाहीर केलं आणि त्याच बरोबर राज्य सरकारने माण गावासाठी काय केले ते जाहीर करावं, अशी मागणी देखील यावेळी गावकऱ्यांनी केली.

दरम्यान, आयटी हब हिंजवडीच्या विकासकामांवरून ग्रामस्थ विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असा संघर्ष सुरू झाला आहे. गेल्या महिनाभरात अजित पवार यांनी हिंजवडीचा दोन वेळेस पाहणी दौरा केला आहे. अनेक ठिकाणी बदल करण्याच्या सूचना अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावर ग्रामस्थ मात्र नाराज आहेत.