“माणुसकीला फुंकर घालणारा कार्यकर्ता हवा!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

0
220

पिंपरी, दि. २१(पीसीबी) – “माणुसकीला फुंकर घालणारा कार्यकर्ता हवा! अराजकीय कार्यकर्ते ही काळाची गरज आहे; कारण राजकारण आता शुद्ध राहिलेले नाही!” असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी हिवरेबाजार येथे व्यक्त केले. आशिया मानवशक्ती विकास संस्था (पुणे) आणि आदर्शगाव हिवरेबाजार परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यकर्ता प्रबोधन शिबिराचे उद्घाटन करताना सबनीस बोलत होते. पद्मश्री पोपटराव पवार, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष श्रमश्री बाजीराव सातपुते, सरपंच विमल ठाणगे, विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष छबुराव ठाणगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

पोपटराव पवार यांनी आपल्या मनोगतातून हिवरेबाजार या गावाचा कायापालट कसा झाला याची हकिकत कथन करून, “माणसाचा देव होण्यापेक्षा त्याने केलेल्या कामाचा देव व्हावा!” अशी भावना व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे (उद्योजक रंगनाथ गोडगे-पाटील स्मृती सामाजिक कार्यकर्ता), प्रगतिशील शेतकरी सुभाष उमाप (यशवंतराव चव्हाण ग्रामभूषण), राजुरी येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय (स्वामी विवेकानंद संस्कारक्षम शाळा) आणि कोथरूड (पुणे) येथील किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉइज युनियन (नारायण मेघाजी लोखंडे दीनबंधू) पुरस्कारांनी या व्यक्ती आणि संस्थांना गौरविण्यात आले. ‘पाठ्यपुस्तकातील कवी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेटीला…’ या कविसंमेलनात रानकवी तुकाराम धांडे, उत्तम सदाकाळ, हनुमंत चांदगुडे, मृणालिनी कानिटकर, शंकर कसबे आणि अस्मिता चांदणे यांच्या कवितांना शालेय विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘कवितेच्या प्रांगणात अर्थात खेड्यातील कविता’ या कविवर्य भरत दौंडकर यांच्या सूत्रसंचालनाखाली संपन्न झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात अंजली कुलकर्णी, डी. के. शेख, प्रशांत केंदळे, सुरेश कंक, राजेंद्र वाघ, गणेश आघाव, शामराव सरकाळे, डॉ. दत्तात्रय जगताप आणि सीमा गांधी यांनी आपल्या वैविध्यपूर्ण कवितांच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. “कवी मनात उजेड पेरण्याचे काम करीत असतो!” असे मत कविराज उद्धव कानडे यांनी कविसंमेलनाच्या अध्यक्षीय मनोगतातून मांडले.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य आणि पर्यावरण या क्षेत्रांत कृतिशील कार्य करणाऱ्या वैजिनाथ घोंगडे (नदी सुधार), रघुनाथ ढोले (वृक्षलागवड अन् जोपासना) आणि श्रीकांत चौगुले (साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक) या विषयावरील अनुभवकथन केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. बाजीराव सातपुते यांनी स्वागत केले. दीपक पवार, अरुण गराडे, जयवंत भोसले, इंद्रजित पाटोळे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुदाम भोरे यांनी आभार मानले.