दि.21 (पीसीबी) – बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. काल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणी मोठी घोषणा केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देखमुख यांनी मोठी मागणी केली आहे.
वैभवी देखमुख यांची मोठी मागणी
मीडियाशी संवाद साधताना वैभवी देखमुख यांनी वडिलांच्या हत्ये प्रकरणी मोठी मागणी करत टाहो फोडला. ‘माझ्या वडिलांना ज्या प्रकारे मारण्यात आलं, तशीच कठोर शिक्षा या आरोपींना व्हावी’, असं वैभवी देखमुख म्हणाल्या. आम्ही पोलिस तपासावर समाधानी नाहीत. या प्रकरणी 7 आरोपी आहेत, मात्र फक्त 4 जणांनाच आतापर्यंत अटक झाली. बाकी आरोपींनाही तात्काळ अटक करण्यात यावी, असंही संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देखमुख यांनी म्हटलंय.
सरपंच हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केला जाणार अशी घोषणा झाल्यानंतर देशमुख कुटुंबीयांनी त्यावर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “या प्रकरणात असलेल्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. माझ्या वडिलांना ज्या प्रकारे मारण्यात आलं, तशीच शिक्षा त्यांना व्हायला हवी. तसेच बीडच्या एसपींची बदली नाही तर त्यांना नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे. कारण ते दुसरीकडे गेल्यावर देखील असंच काहीतरी होऊ शकते. आम्ही या पोलीस कारवाईवर समाधानी नाहीत”, असंही वैभवी देखमुख म्हणाल्या.
मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, या सर्व घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना काल मोठी घोषणा केली. वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा लावण्यात येणार असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले.
तर, मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली. या घटनेमध्ये ज्यांनी कोणी अश्या पद्धतीने हत्या केली, त्यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे…ही माझी भूमिका असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. दरम्यान, विरोधकांकडून या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. काल विधानपरिषदेत यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराड याचं नाव घेऊन त्यांचा पत्ता देतो, त्यांना अटक करणार का अशी भूमिका व्यक्त केली होती. त्यावर धनंजय मुंडे यांनी नंतर प्रतिक्रिया दिली होती.