माझ्या वडिलांचा खून झाला, कोर्टात १८ वर्षे खटला सुरू आहे…

0
2

धाराशिव, दि. ११ –
देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जावा. वर्ष-दोन वर्षात त्याचा निकाल लावून आरोपींना फासावर चढवावे, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. तर जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत संपूर्ण धाराशिवकर तुमच्या कुटुंबाच्या मागे उभे आहे, असे वचन त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिले. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धारशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या सभेतून ते बोलत होते.

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन तरुणांच्या महाराष्ट्रात हत्या झाल्या. त्याच्या निषेधार्थ आणि या कुटुंबांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने आक्रोश मोर्चा आज धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आलाय. ही घटना घडल्यानंतर मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. दीदी आणि तिच्या लहान भावाला मी बघितलं. मला स्वतःची आठवण झाली. आपण आज न्याय मागण्यासाठी येत आहोत. पण, आपण स्वतः माणसं आहोत. आपल्यालाही मुलगी आणि मुलगा आहे. त्यांच्यासाठी आपण जगत असतो. त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो. मुलीला वडिलांचा आधार असतो. नुसते वडील आहेत म्हटलं तरी शंभर हत्तीचा बळ त्या लेकराच्या हातात असतं. वडिलांना वाटतं की मी माझ्या मुलाचा संभाळ करेल, त्याला मोठं करेल. ज्या क्षणाला संतोष देशमुख यांना जीवघेणी मारहाण होत होती, ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता तेव्हा त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील? माझ्या पाठीमागे माझ्या लेकरांचं कोण रक्षण करेल? असा विचार त्यांच्या मनात आला नसेल का? ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली, हे बघितल्यानंतर माणूस म्हणून या गोष्टीचा राग येतो का नाही? या गोष्टीची चिड येते की नाही? असा सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा
ओमराजे निंबाळकर पुढे म्हणाले की, अशा पद्धतीच्या वृत्तीला तातडीने कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे, त्यांना फाशीपेक्षा दुसरी कुठलीच शिक्षा असू शकत नाही, अशी माणसं समाज व्यवस्थेत जगायच्या लायक नाहीत, त्यांना तातडीने फासावर लटकवण्याचे काम सरकारचे आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत संपूर्ण धाराशिवकर तुमच्या कुटुंबाच्या मागे उभे आहे, असे वचन त्यांनी यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिले. 3 जून 2006 ला माझ्या वडिलांची हत्या झाली, आज अठरा वर्ष झालेत, अजूनही प्रकरण ट्रायल कोर्टात आहे. सुरेश आण्णा माझी तुम्हाला विनंती आहे, या वृत्तीला जर धडा शिकवायचा असेल, या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टाकडे चालवला जावा. वर्ष-दोन वर्षात त्याचा निकाल लावून आरोपींना फासावर चढवावे. आज कुठल्याही समाजाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातो. ही जात नसते तर वृत्ती असते. याचे काय कारण आहे? त्यांना वाटत असतं मी पदावर आलो, आमदार, मंत्री झालो, माझ्या पक्षाचे सरकार तिथे आले आहे. दोन-तीन टर्म झाल्यावर त्या माणसाला मस्ती चढते, त्यांना वाटतं की सगळंच आपल्या हातात आहे. दोन-तीन खून केले तरी आम्ही पचवू शकतो. त्यामुळे त्या माणसाला आत्मविश्वास येतो आणि मग अशा पद्धतीच्या घटना घडतात. हा आत्मविश्वास जो माणूस देत आहे, या वृत्तीचा नायनाट करणे गरजेचे आहे. ही वृत्ती कुठल्याही समाजात असेल, तरी त्याच ठिकाणी ठेचून माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतून संपवणे गरजेचे आहे, असेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.