माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही – अजित पवार

0
296

बारामती, दि. २५ (पीसीबी) – मागील अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर पवार बारामतीमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही, या आपल्या विधानाचा अजित पवार यांनी आज बारामतीत बोलताना पुनरुच्चार केला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. बारामतीच्या विकासासाठी मी कायमस्वरूपी कटिबद्ध आहे, माझ्याबाबत विनाकारण संशय निर्माण करणारे, अफवा पसरवणारे वातावरण तयार केले जात आहे. माझी जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, अशा बातम्यांकडे बारामतीकरांनी लक्ष देऊ नये, असेही पवार यांनी सांगितले. अजित पवार आणि बारामती हे अतूट समीकरण असून मी कायम बारामतीच्या विकासासाठी वचनबद्ध असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गेल्या काही दिवसात माध्यमातुन आलेल्या बातम्यांमुळे आपली बदनामी झाल्याची खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली. नॉट रिचेबल हा प्रकार अवघड आहे, असे सांगत पवार यांच्यावर एवढं प्रेम का उतू चाललय हेच समजत नाही, असे ते म्हणाले. विरोधकांच्या बाबतीत मी सॉफ्ट असतो आणि टीका करीत नाही हा आरोप देखील मला मान्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सभ्य व सुसंस्कृतपणा असून त्या सभ्यतेची पातळी मी कधीही ओलांडणार नाही, संसदीय आयुधांचा वापर करून विरोधक व सरकारला धारेवर धरण्याचे काम अधिवेशनाच्या काळात मी केले. मात्र, एकमेकांवर खुर्च्या भिरकाविणे, अंगावर धावून जाणे, अयोग्य शब्दांचा वापर करणे, विधिमंडळात कागदे भिरकावणे याला तीव्र विरोध म्हणत असतील तर असा विरोध मला कदापीही मान्य होणार नाही.
आपल्याबद्दल आलेल्या बातम्यां बाबत बोलताना एखाद्याच्या मागे किती हात धुऊन लागावे याला पण काही मर्यादा असतात, त्या मर्यादा पाळल्या गेल्या नाही, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखविली. काहीही झाले की अजित पवार नॉट रिचेबल आहे, अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमातून येतात आणि त्याचा विपर्यास केला जातो. मात्र, बारामतीकरांना मी सांगू इच्छितो की शेवटच्या क्षणापर्यंत मी बारामतीच्या विकासासाठी कार्यरत असेल.

ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा मी स्वतः कार्यकर्त्यांच्या जीवावरच मोठे झालेलो आहेत. त्यामुळे आमच्या राजकीय प्रवासात कार्यकर्त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, अशी अपेक्षा देखील पवार यांनी व्यक्त केली.