माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा-आमदार अमोल मिटकरी

0
2

दि.२३(पीसीबी)-अजित पवार यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रचारासाठी हेलिकॉप्टर दिलं होतं. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा. मला कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी मला आमदार केले, असे उद्गार आमदार अमोल मिटकरी यांनी काढले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी अजितदादांना त्यांना कशाप्रकारे राजकारणात आणले आणि सामान्य व्यक्तीपासून ते आमदार कसे केले, याचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला.

महाराष्ट्राला एका धडाकेबाज नेतृत्त्वाला मुकावं लागलं. मी फार सामान्य कार्यकर्ता आहे. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा. आमच्या घरात कुठलाही राजकीय वारसा नव्हता. माझ्या वडिलांनी, आजोबांनी, खानदानात कोणाला ग्रामपंचायत सदस्यत्व काय असतं हे माहिती नव्हतं. 2019 साला बारामतीच्या शारदा प्रांगणात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्यानिमित्ताने एका व्याख्यानाचा योग आला. मला चांगलं आठवतं, रविवारचा दिवस होता. त्यादिवशी दादा उद्घाटन करुन जाणार होते. त्यांनी कार्यक्रमाचा विषय वाचला, वक्त्याचं नाव वाचलं, मला म्हणाले, तुम्ही कुठे असता, मी म्हटलं अकोल्यात असतो. तुम्ही काय करता विचारलं, मी म्हटलं, मी महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकरांचा विचार मांडणारा वक्ता आहे. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, असे मी त्यांना सांगितलं. चळवळीबद्दल नितांत आदर असणाऱ्या दादांनी माझ्या व्याख्यानाचा विषय विचारला.

माझ्या व्याख्यानाला सुरुवात होण्यापूर्वी आयोजकांना विनंती केली की, दादांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करुन निघून जावे. पण दादांना कोणीतरी सांगितलं की, संभाजी महाराजांचं चरित्र या व्यक्तीच्या तोंडातून ऐका, हा जरा वेगळ्या पद्धतीने मांडतो. दादांनी गाडी टर्न केली आणि श्रोत्यांमध्ये जाऊन बसले. दोन तास 15 मिनिटे दादांनी भाषण ऐकलं. भाषणानंतर तीन महिन्यांनी मला दौंड शुगर कारखान्यातून त्यांच्या स्वीय सहायकाचा फोन आला. त्यावेळी दादांनी म्हटलं, मी तीन महिन्यांपूर्वी बारामतीत तुमचं व्याख्यान ऐकलं, संभाजी महाराजांवर खूप चांगलं बोललात तुम्ही. तुम्हाला कधी मुंबईला येता आलं तर या, मला पक्ष कार्यालयात भेटा. त्यावेळी पक्ष कार्यालय बॅलार्ड पिअरला होतं, त्यादिवशी ते बंद होते. मग मला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेबांच्या घरी ढिकले साहेबांनी अजितदादांच्या भेटीचा वेळ दिला. अजितदादांनी मला विचारलं की, आमच्या पक्षात येणार का, काम करणार का? मी म्हटलं, माझा राजकारणाशी संबंध नाही, तुम्हाला पाहायला भेटलं हेच माझं सौभाग्य समजतो. त्यावेळी जयंत पाटील, भुजबळ साहेब तिकडे होते.