माझी साथ सोडली त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही – अजित पवार

0
190
  • विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करा – अजित पवार
  • माझा शंभर टक्के पाठिंबा बारणे यांनाच – अजित पवार

पिंपरी – माझी साथ सोडली, त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही. त्यामुळे खोटा-नोटा प्रचार व अफवांवर विश्वास ठेवू नका, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना चांगलेच फटकारले. मागील निवडणुकीत श्रीरंग बारणे आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो असलो तरी, आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आता माझा शंभर टक्के पाठिंबा बारणे यांनाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

व्यासपीठावर शिवसेना नेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, आरपीआयचे नेते चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत, कुणाल वाव्हळकर, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले तसेच माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, अपर्णा डोके, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भाजपचे निवडणूक प्रमुख सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे तसेच जगदीश शेट्टी महेश कुलकर्णी अजीज शेख, फजल शेख, बाबा कांबळे, सुजाता पालांडे, कविता अल्हाट, वर्षा जगताप, नारायण बहिरवाडे, मोरेश्वर शेडगे, भाऊसाहेब आडागळे आधी पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करायचे आहे. शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रस्त्यांचे जाळे, रिंग रोड, उड्डाणपूल असे कितीतरी मोठे प्रकल्प करायचे आहेत. त्यासाठी लागणारा निधी हा केंद्र शासनाकडूनच मिळणार आहे. त्यासाठी खासदार बारणे यांना विजयी करून मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. त्यांनी देशाचा विकास गतिमान केला. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे भारताला जगात मानाचे स्थान मिळाले. देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली. ती तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या ठराविक लोकांनी काम करून चालणार नाही तर तळागाळातील कार्यकर्त्यांनी देखील काम केले पाहिजे. इमाने इतबारे काम करावे. कोणीही गंमत-जंमत करायचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुमचा बंदोबस्त करावा लागेल, असे अजित पवार यांनी बजावले.

आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभात मी रात्री 11 वाजता पोहोचलो. त्यावेळी विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी डाव साधला. मी येताच माझे लक्ष नसताना त्याने पाय पकडले. मी विचारले, का रे बाबा? तर म्हणाला दर्शन घेतले आणि ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. म्हणे दादांचे आशीर्वाद घेतले. मी कशाला त्याला आशीर्वाद देऊ? माझा पूर्ण पाठिंबा महायुतीच्या उमेदवारांना आहे. पराभव दिसत असल्यामुळे विरोधक खोटा नोटा प्रचार करून संभ्रम निर्माण करीत आहेत. त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे अजित पवार यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले की, अजितदादा आल्यामुळे महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संपूर्ण मतदारसंघात बारणे यांना विरोधच उरलेला नाही. त्यामुळे बारणे यांना विक्रमी मताधिक्य मिळेल यात शंकाच नाही. पिंपरी, चिंचवड व मावळ या मतदारसंघांच्या तोडीचे मताधिक्य रायगड जिल्ह्यातून मिळवून देऊ.

खासदार बारणे यांनी त्यांच्या भाषणात गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती दिली. सभागृहात स्वतःच्या कामाचा ठसा उमटवत सातत्याने पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याचे त्यांनी सांगितले. केलेली विकास कामे व मतदारांशी सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळे आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार संघातील उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदारांनी धनुष्यबाणाला मतदान करून मला पुन्हा आपल्या सेवेची संधी द्यावी, असे आवाहन बारणे यांनी केले.