दि . १५ ( पीसीबी ) – प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका चित्रा पालेकर यांनी अनेक वर्षांपासून एलजीबीटीक्यू समुदायासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर हे त्यांचे पती आहेत. अमोल आणि चित्रा पालेकर यांची मुलगी, शाल्मली पालेकर समलैंगिक आहे. १९९३ साली शाल्मलीने ही गोष्ट तिच्या आई चित्रा यांच्यासमोर उघड केली होती. शाल्मलीने जेव्हा चित्रा पालेकर यांना सांगितले की ती लेस्बियन आहे, तेव्हा त्यांनी अत्यंत समजूतदारपणे तिचा स्वीकार केला, याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सविस्तर माहिती दिली.
ती माझी मुलगी आहे, मग काय फरक पडतो? :
‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला (YouTube channel) दिलेल्या मुलाखतीत चित्रा पालेकर यांना त्यांच्या मुलीच्या समलैंगिकतेबद्दल आणि त्यांनी तो कसा स्वीकारला, याविषयी विचारण्यात आले. यावर बोलताना त्या म्हणाल्या, “१९९३ मध्ये शाल्मलीने मला सांगितले की ती लेस्बियन आहे. त्यावेळी तिचे बीएचे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले होते. मी ते लगेच स्वीकारले. ते न स्वीकारण्याचे कारणच काय होते? ती माझी मुलगी आहे ना. मग याने काय फरक पडतो? ती काल जशी होती, तशीच ती आजही आहे. हे तिचे आयुष्य आहे आणि तिला ते एका स्त्रीबरोबर घालवायचे आहे, ते कसे जगायचे हा तिचा प्रश्न आहे.
जर मी स्वतःला आधुनिक विचारांची म्हणवते, तर मी एवढा विचार नक्कीच करायला हवा. पण त्या पलीकडे ती माझी मुलगी आहे ना, मला ती चांगली ठाऊक आहे, ती काय आहे आणि कशी आहे!”
चित्रा पालेकर पुढे म्हणाल्या, “ती तयारी करून आली होती. तिला वाटले होते की मला खूप मोठा धक्का बसेल. पण मला धक्का बसला नाही, याचा तिलाच धक्का बसला. तरीही त्यावेळी ती मला हे सांगताना खूप तणावात होती. आम्ही दोघी एकमेकांना मिठी मारून खूप रडलो. कारण शेवटी तिने मला इतक्या वर्षात ही गोष्ट का नाही सांगितली, असे मला वाटले. तिने हे सर्व एकटीने सोसले. जवळपास ६-७ वर्षे तिने मला काहीही सांगितले नव्हते. मला असे वाटले की आपण आपल्या मुलीला पूर्णपणे ओळखतो, आपण तिच्या जवळ आहोत, पण तसे नव्हते. तिने काहीतरी बाजूला ठेवले होते आणि तिने ते एकटीने भोगले. कोणत्या आईला हे वाईट वाटणार नाही?”
मुलगी लेस्बियन असल्याचे कळल्यानंतर चित्रा पालेकर यांनी तिला त्वरित स्वीकारले. त्या म्हणाल्या, “मला याबद्दल फारशी माहिती नव्हती. मी तिला म्हटले की, तुझ्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. तू बॅडमिंटन खेळते म्हणून मी बॅडमिंटनचे सगळे नियम समजून घेतले. तुला इंग्रजी आवडते म्हणून मी सगळी पुस्तके वाचली.
प्रत्येक वेळी तुझ्या जगात जबरदस्तीने न घुसता ते समजून घेण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. आता हे खूप महत्त्वाचे आहे. हे तर समजून घेणे अधिक महत्त्वाचे होते. म्हणून मी तिला विचारले की तू मला हे समजावून सांगू शकशील का? त्यावेळी एलजीबीटीक्यू संबंध गुन्हा मानले जायचे. म्हणून मी तिला म्हटले की तू मला समजाव आणि तिने मला सर्व समजावून सांगितले. मला माझ्या मुलीचे विश्व जाणून घ्यायचे होते, म्हणूनच मी सर्व काही करत होते.”
ती लेस्बियन असेल असे मला कधी वाटले नव्हते :
चित्रा पालेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पुढे सांगितले, “माझे माझ्या मुलावर प्रेम आहे, असे प्रत्येक आई म्हणते. पण त्या वाक्याच्या पलीकडे जाऊन तपासले पाहिजे की आपले खरे प्रेम आहे की आपण फक्त आपला अधिकार दाखवतोय. मला त्यातले काही करायचे नव्हते. माझे फक्त तिच्यावर प्रेम होते. तिने तिचे आयुष्य स्वतःच्या हिंमतीवर अत्यंत चांगल्या रीतीने जगावे, मग ती कोणत्याही लैंगिकतेची असो.” त्या पुढे म्हणाल्या, “ती लेस्बियन असेल असे मला कधी वाटले नव्हते.
कारण मला याबद्दल माहिती असले तरी, आपल्याच कुटुंबातील कोणीतरी असेल असे वाटले नव्हते. कारण आपली विचारसरणी वेगळी असते. पण तिने सांगितल्यानंतर एका क्षणात माझ्या डोळ्यासमोर आले की खरंच याने काही फरक पडतो का? माझी मुलगी आहे, माझे तिच्यावर प्रेम आहे, ही दोन वाक्ये पुरे आहेत आणि मी तिला त्याच रूपात स्वीकारले.”