‘माझी मिळकत, माझी आकारणी’ योजनेमुळे 500 मिळकती करकक्षेत!

0
334

योजनेचे मोठे यश, सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांची माहिती

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने सुरू केलेल्या ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे अवघ्या चार महिन्यांत काही गृहनिर्माण संस्थांमधून आलेल्या 23 अर्जातून नोंदणी न झालेल्या तब्बल 506 नवीन मिळकती करकक्षेत आल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी महापालिकेच्या तिजोरीत कोट्यावधी रूपये कराचा भरणा वाढणार आहे. भविष्यातही ही योजना अधिक व्यापक होणार असून महापालिकेचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली.

शहरात 5 लाख 77 हजार मिळकतींची नोंदणी आहे. या मिळकत धारकांकडून महापालिका कराची आकारणी करून वसूल करते. कर संकलन विभागाने 1 एप्रिल 2022 पासून शहरातील मालमत्ता धारकांनी ‘माझी मिळकत माझी आकारणी’ या योजनेद्वारे स्वंयस्फूर्तीने मालमत्ता कराची नोंदणी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलतीची घोषणा केली. अशा मालमत्ता धारकांना सामान्य करात 5 टक्के सवलत देण्यात येत आहे.

या योजने अंतर्गत अवघ्या चार महिन्यात शहराच्या विविध विभागीय कर संकलन कार्यालयाच्या हद्दीत तब्बल 685 मिळकत धारकांनी ऑनलाइन प्रक्रिया करून अर्ज केले आहेत. यामध्ये 192 मालमत्ता धारकांना कर आकारणी सुरू झाली आहे.

56 मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर आकारणीसाठी सादर केलेली माहिती व त्यानुसार होणारी कर आकारणी जाणून घेऊन आकारणी मान्य केलेली आहे. यामधील 11 जणांनी ऑनलाइन पध्दतीने 2 लाख 16 हजार 435 रूपयांच्या कराचा भरणा देखील केला आहे. 8 मालमत्ताधारकांनी या योजनेतील आकारणी नामंजूर केलेली असून उर्वरीत लोकांनी मंजूर, नामंजूर पैकी कोणताही पर्याय निवडलेला नाही. प्राप्त अर्ज, माहिती व कागदपत्रांची तपासणी करुन मालमत्ता कर आकारणीची कार्यकक्षेत आणण्याची विभागामार्फत कार्यवाही सुरु आहे.

याबाबत माहिती देताना सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी मिळकत माझी आकारणी’ योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत किवळे, चिखली, थेरगाव, पिंपरी वाघेरे, वाकड आणि मोशी या भागासह आदी भागातील सोसायटीमधील वैयक्तिक मालमत्तेच्या आकारणीसाठी एक अथवा दोन मालमत्ताधारकांनी अर्ज केले. त्यामुळे कर संकलन विभागाला संबंधित मालमत्तांची नोंदणी करताना त्यांच्या इमारतीमधील सदनिकांना कराची आकारणी होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार 23 जणांनी केलेल्या अर्जांमुळे नवीन 506 मालमत्तांची नोंदणी केली आणि त्या कर कक्षेत आल्या आहेत. यामध्ये 492 निवासी, 12 बिगरनिवासी तर 2 औद्योगिक नवीन मालमत्ता आढळून आल्या आहेत. त्यांची कर आकारणी करणे शक्‍य झाले आहे. तसेच ‘माझी मिळकत, माझी आकारण’ योजने अंतर्गत आलेल्या प्रत्येक अर्जाची योग्य ती शहानिशा करण्याची गटलिपिक, मंडलाधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. त्यामुळे भविष्य काळातही कर कक्षेत नसलेल्या मिळकती सापडणारच आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.

चार महिन्यांत 288 कोटी महापालिका तिजोरीत जमा
चालू आर्थिक वर्षातील अवघ्या चार महिन्यांत 2 लाख 18 हजार 392 मालमत्ता धारकांनी 288 कोटी रुपयांचा कराचा भरणा महापालिका तिजोरीत भरला आहे. यामध्ये 1 लाख 44 हजार 445 मालमत्ता धारकांनी पावणेदोनशे कोटी रुपयांचा ऑनलाइन भरणा केल्याचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले.