दि. 21 (पीसीबी) – विज्ञान भवन येथे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर तालकटोरा स्टेडियममध्ये संमेलनाचे दुसरे उद्घाटनपर सत्र पार पडले. यावेळी नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी पूर्व संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. तेव्हा आपल्या भाषणातून तारा भवाळकर यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता जोरदार टोलेबाजी केली. ‘माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?’ असा टोला लगावत त्यांनी खळबळ उडकून दिली.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करताना ‘जैविक’ संदर्भात वक्तव्य केले होते. ‘मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्टय़ा झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे,’ असे मोदी म्हणाले होते. मोदींच्या या विधानावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आपल्या लिखित भाषणात संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, शिवला तर विटाळ होतो आणि दुसरा स्त्रीचा. निसर्ग धर्माने दिलेली मासिक पाळी तिची! त्यालाही विटाळच म्हणायचे. आता ही बाई कुठल्याही शाळा, कॉलेजात गेली नाही, कुठल्याही स्त्री मुक्तीवालीकडे गेली नाही, तिला कुठली ‘सिमोन दि बोव्हा’ माहिती नव्हती. ती काय म्हणते? ‘देहाचा विटाळ, देहीचं जन्मला, शुद्ध तो जाहला कवण प्राणी।। उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थानं। कोण देह निर्माण नाही जगी।।’ असा मला एखादा माणूस दाखवून द्या की, जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आला नाही. आता आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा वेगळा विषय आहे. परंतु, त्याचा भंडाफोड या आमच्या संत कवयित्रींनी 13 आणि 14 व्या शतकामध्ये केला आहे.
स्त्रिया आणि त्यांच्या प्रतिभा यासंदर्भात तारा भवाळकर म्हणाल्या की, प्रतिभा ही महिलांमध्येच उपजत निर्मितीच्या दृष्टीने असते. ज्याला आपण कला म्हणत असतो. कला म्हणजे, संवेदनशीलता नेमक्या शब्दात मांडणे. ती अनुभवातून परिपक्व होते, त्या इतिहासाच्या प्रवाहाकडे आपण पाहणार आहोत की नाही. त्या मुद्द्याकडे लक्ष न देता आपण पुढे चाललो आहोत, आणि आम्ही सुधारलेले आहोत, असे आपण म्हणत असतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठी भाषा बोलण्यातून विस्तारली!
भाषा ही बोलली तर जिवंत राहते, नुसती पुस्तकात आणि ग्रंथात असून उपयोग नाही असेही भवाळकर म्हणाल्या. महाराष्ट्राला पांडुरंगाचे स्मरण करायला लावणारी ही मराठी भाषा आमच्या संतांनी जिवंत ठेवल्याचे त्या म्हणाल्या. मराठी भषा बोलण्यातून विस्तारली आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना खेडोपाड्यातील मावळे सवंगडी म्हणून मिळाले, असेही भवाळकर म्हणाल्या.
प्रत्येक संमेलनात सीमाप्रश्नावर आंदोलन होते. ते आपली मागणी मांडतात, पुढे काहीही होत नाही. लोकसंस्कृतीचा अनुबंध सीमाप्रदेशातील आहे. भांडणापेक्षा, संघर्षापेक्षा तो संवादातून मिटायला पाहिजे आणि ते केवळ अभ्यासातूनच शक्य आहे. असे झाले तर वर्षानुवर्षे भिजत पडलेला सीमाप्रश्न सुटणे सुलभ होईल.
जोपर्यंत शिक्षणव्यवस्था मराठीत होत नाही तोपर्यंत मराठीचा उद्धार होणार नाही. मराठी शाळा बंद पडत आहेत. शाळांच्या जागा विक्रीला जात आहेत. खासगी शाळांनी मराठीपण टिकवून ठेवले पाहिजे. आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालणाऱया पालकांची जेवढी चूक आहे तेवढीच मराठी शाळा बंद होताना उघडय़ा डोळ्यांनी पाहणाऱया सरकारचीही ती चूकच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
आज येथे फार काही बोलायचं नाही, नंतर बोलायचं असा दम मला भरला आहे. पण इतकंच सांगेन, देशाच्या पंतप्रधानांना जी विठ्ठलाची मूर्ती दिली आहे ते महाराष्ट्राचे आराध्य आहे. ते आमच्या उदार संस्कृतीचे प्रतीक आहे, असे तारा भवाळकर विज्ञान भवन येथील उद्घाटन सोहळय़ात म्हणाल्या.
एक स्त्री अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली हे महत्त्वाचे नाही तर गुणवत्ता हा विषय महत्त्वाचा आहे, असेही भवाळकर म्हणाल्या. मराठी भाषा संतांनी टिकवली, आमचे संत पुरोगामी होते, काही लोक उपहासाने ‘फुरोगामी’ म्हणतात, तुम्ही काहीही म्हणा, असेही भवाळकर म्हणाल्या.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. तिचा आपण सोहळा करतो मात्र जोपर्यंत मराठी भाषा ही सगळ्यांची अर्थात तळागाळाची होत नाही, बोलीभाषांची होत नाही तोपर्यंत ती अभिजात नव्हे.
भाषा ही तोडणारी नव्हे, जोडणारी हवी
मराठी फक्त लिखितच नाही तर ती बोलीतून पसरली आहे. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा ही जोडणारी असायला हवी, तोडणारी नव्हे, असे मत तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.