माझं पिंपरी चिंचवड शहर हा अभिमान जागृत होत असल्याचा आनंद – ज्ञानेश्वर लांडगे

0
8

दि . 5 ( पीसीबी ) – धार्मिक आणि ऐतिहासिक संस्कृतीची पार्श्वभूमी असलेल्या या उद्योगनगरीतील नागरीक आता, हे माझं शहर असल्याचा अभिमान व्यक्त करतात यामुळे ऊर भरून येतो, अशी भावना पिंपरी चिंचवडचे जन्मदाते ज्ञानेश्वर लांडगे यांनी आज येथे व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड शहर निर्मितीच्या ५५ व्या वर्धापनदिना निमित्त अंशुल प्रकाशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. येथील सायन्स पार्क मधील प्रेक्षागृहात आयोजित या कार्यक्रमाला नगरपालिकेचे पहिले नगरसेवक मधु जोशी, महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे तसेच १९७० मध्ये सरपंच असलेल्या तुळशीराम काळभोर, अनंतराव गावडे, यांच्यासह लांडगे, वाघेरे, भिसे, बारणे, काटे या घराण्यांचे सर्व कुटुंबिय या हृदय सोहळ्याला उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीच्या प्रवासावर आधारीत नाटकाचा प्रयोग, लेखक विजय जगताप यांनी शहराच्या इतिहासावर लिहिलेल्या ग्रंथातील, हे शहर कसे बनले व येथील भूमीपुत्रांचे योगदान या लेखांचे अभिवाचन, लेखक जगताप यांची प्रकट मुलाखत आदी कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
‘ आपण भोसरीचे सरपंच कसे झालो आणि या शहराला जन्म देण्यासाठी अण्णासाहेब मगर यांनी आम्हा चार गावच्या सरपंचांना कसे प्रवृत्त केले हा सगळा प्रवास लांडगे यांनी आपल्या भाषणात उलगडून सांगितला.
मधु जोशी, प्रविण तुपे यांचीही यावेळी भाषणे झाली. निवेदक विजय बोत्रे पाटील व संदीप साकोरे यांनी लेखांचे अभिवाचन केले. नाट्य प्रयोगामुळे त्या काळातील घटनांचे सर्वांना स्मरण झाले. जगताप यांनी आपल्या मुलाखतीत शहर निर्मितीचा पट उलगडून सांगितला. प्रा. माया मुळे यांनी प्रास्तविक , गोरख गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर संभाजी बारणे यांनी आभार मानले.