माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार परभणी, हिंगोली लोकसभा मतदार संघातून लढणार

0
283

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यासाठी महायुती व इंडिया आघाडी आतापासूनच कामाला लागले आहेत. त्यासाठी राज्यातील राजकीय पक्षानी रान पेटवले असतानाच त्यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे. राज्यातील माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमच्या महासंचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मोपलवार यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात असले तरी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी परभणी, हिंगोली लोकसभा मतदार संघातून मोपलवार हे रिंगणात उतरणार असल्याचे समजते.

‘एमएसआरडीसी’च्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून मोपलवार यांना काही दिवसांपूर्वीच दूर करण्यात आले होते. राज्यातील मेट्रो, सागरी सेतू, उड्डाणपूल, रस्ते आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वॉर रूमची स्थापना केली होती. या वॉर रूमच्या माध्यमातून प्रकल्पांचा आढावा घेतला जात होता. त्यानंतर गुरुवारी मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमचा अचानक राजीनामा दिला. मोपलवार यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला असल्याचे कळते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीयाशी असलेले संबंध बिघडल्याने मोपलवार हे गेल्या काही दिवसापासून नाराज होते. त्यामुळे राजीनामा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मोपलवार यांनी आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मोपलवार परभणी अथवा हिंगोली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची चाचपणी करीत आहेत. त्यामुळे ते या दोनपैकी एका ठिकाणी निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते कुठल्या पक्षाकडून की अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार हे ठरले नसले तरी याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.