“माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे सदिच्छादूत!” – ॲड. सतिश गोरडे

0
206

पिंपरी – “माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे सदिच्छादूत म्हणून कार्य करीत असतात!” असे मत ज्येष्ठ विधिज्ञ आणि रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघ सचिव ॲड. सतिश गोरडे यांनी बुधवार, दिनांक ०१ मे २०२४ रोजी पिंपरी वाघेरे येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. प्रभारी प्राचार्य डॉ. माधव सरोदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच उद्योजक विजय चौधरी, बाळासाहेब वाघेरे, संजय गायके, उपप्राचार्य प्रा. डॉ. शहाजी मोरे, प्रा. डॉ. नीळकंठ डहाळे, प्रा. डॉ. संजय खत्री, प्रा. विद्यासागर वाघेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी वाघेरे येथे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात येतो. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, “माजी विद्यार्थी मेळाव्याच्या या कल्पनेचे मी मनापासून कौतुक करतो. येथून शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर बाहेरच्या जगातील विविध क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध केले आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला महाविद्यालयाला, शिक्षकांना तसेच आपल्या सहाध्यायी स्नेहींना भेटण्याची ही एक सुवर्णसंधी असते. या भेटीगाठीतून जुने ऋणानुबंध पुनरुज्जीवित होतात; त्याप्रमाणे विचारांची देवाणघेवाण होते. अशा स्नेहमिलनातून नवी ऊर्जा घेऊन हे माजी विद्यार्थी महाविद्यालयाचे सदिच्छादूत म्हणून कार्य करीत महाविद्यालयाचा नावलौकिक वृद्धिंगत करतात!”

प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “समाजातील सर्व घटकांना ज्ञानाच्या प्रकाशाने सशक्त बनविण्याचे अभियान आम्ही सुरू केले आहे. आमच्या चिंतेचे विस्तृत मापदंड आहेत जसे की, आमच्या विद्यार्थ्यांना शहर, राज्य, राष्ट्र, किंबहुना संपूर्ण जगाच्या पातळीवर चांगले नागरिक बनवणे. शिक्षक या नात्याने आपण आदर, सहानुभूती, प्रेम, सहिष्णुता, प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुसकी हे गुण तुमच्यात निर्माण करू शकू का हीच आमची चिंता आहे!” असे विचार मांडले.

यावेळी माजी विद्यार्थी संजय गायके, विजय चौधरी, यशोदा नाईकवडे, आर जे प्रशांत गाडेकर, दिलीप मोरे, अशोक धायगुडे, मंगेश म्हस्के, ज्ञानेश्वर जायभाये यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील विशेष प्रावीण्य संपादन करणार्‍या प्राध्यापकांचा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. कामायनी सुर्वे आणि प्रा. डॉ. प्रतिभा कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. शहाजी मोरे यांनी आभार मानले.