नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – छत्तीसगड येथील कोळसा खाणीमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना सीबीआयच्या दिल्ली विशेष न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
विजय आणि देवेंद्र दर्डा, जेएलडी कंपनीचे संचालक मनोज जयस्वाल यांच्यासह सात जणांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. यामध्ये तीन आयएएस अधिकाऱ्यांना तीन-तीन वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सात जणांना दोषी ठरवल्यानंतर आज या प्रकरणाची सुनावणी आज झाली. या प्रकरणातील एक अधिकारी एच. सी. गुप्ता यांना तीन वर्षाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
१९९९ ते २००५ या काळात जुने ब्लॉक्स आले होते. त्याची माहिती लपवून गैर मार्गाने कंत्राट मिळवल्याचा आरोप विजय दर्डा आणि इतर आरोपींवर होता. युपीए सरकारच्या काळात जे घोटाळे गाजले त्यातील हा एक प्रमुख घोटाळा होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना जी पत्र त्या काळात दिली गेली होती, त्यामध्ये माहिती लपवल्याचाही आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणात सीबीआयने ‘क्लोजर रिपोर्ट’ सन २०१२ ला दिला होता. तेव्हा न्यायालयाने (Court) तो फेटाळला होता. गेल्या नऊ वर्षांत आम्ही न्यायालयाच्या चकरा मारतोय, आधीच आम्ही वेदना भोगतोय. त्यामुळे शिक्षेचा कालावधी कमी करण्याचा युक्तिवाद दर्डांच्यावतीने करण्यात आला होता. १२० बी कलमान्वये फसवणूक केल्याचा प्रमुख आरोप विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांच्यासह सर्व आरोपींवर होता. या शिक्षेला दर्डा न्यायालयात आव्हान देऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.












































