माजी राज्यपाल एस.एम. कृष्णा यांचे आज सकाळी निधन

0
55

दि.10 (पीसीबी) – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मैल्लया कृष्णा यांचे आज (१० डिसेंबर) सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. एस. एम. कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. मध्यरात्री २.४५ च्या सुमारास त्यांनी त्यांच्या बंगळुरू येथील राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. राजकीय क्षेत्रातील सहा दशकाच्या त्यांच्या कामाची पावती म्हणून एस. एम. कृष्णा यांना २०२३ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते. एस. एम कृष्णा यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रेमा, दोन मुली शांभवी आणि मालविका आहेत.

एस. एम. कृष्णा हे राजकारणातले दिग्गज नेते मानले जात. २०१७ मध्ये भाजपात प्रवेश केल्यापासून राजकीयदृष्ट्या ते निष्क्रिय होते. आपल्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल या पदांसह अनेक महत्त्वाची सार्वजनिक पदं भुषवली होती. अमेरिकेतल्या लॉ स्कूलचे अत्यंत हुशार विद्यार्थी असलेले कृष्णा हे वोक्कलिगा समुदायातले आहे. त्यांचं मूळ गाव मंड्या जिल्ह्यातील मद्दूर हे आहे जे जुन्या मैसूर प्रदेशाचा भाग आहे.

एस. एम कृष्णा यांचा राजकीय प्रवास १९६० च्या दशकात सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी अपक्ष म्हणून मद्दूर विधानसभेची जागा जिंकली. त्यानंतर ते प्रजा सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावरही जिंकले. १९६८ मध्ये एस. एम. कृष्णा हे मंड्या या मतदारसंघातून खासदार झाले. अत्यंत अल्प कालावधीत १९६८ ते १९७० आणि १९७१ ते ७२ अशा कालावधीत ते दोनदा खासदार झाले. असं असलं तरीही एस. एम. कृष्णा यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय राहायचं होतं. त्यामुळे त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली. १९७२ ते ७७ या कालावधीत ते आमदार झाले. १९७२ मध्ये देवराज उर्स मंत्रिमंडळात एस. एम. कृष्णा वाणिज्य उद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री होते.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष म्हणून १९९९ मध्ये त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचीही सूत्रं स्वीकारली. निवडणुकीच्या वेळी यात्रा काढणाऱ्या पहिल्या राज्य नेत्यांपैकी ते एक होते. KPCC चे प्रमुख म्हणून त्यांनी १९९९ च्या निवडणुकीपूर्वी पांचजन्य यात्रा काढली होती जी यशस्वी ठरली.