माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस सोडणार ?

0
181

कराड (सातारा), दि. १५ (पीसीबी) : काँग्रेस पक्ष लोकशाही पद्धतीनं चाललेला नाही, मागील 24 वर्षे संघटनात्मक निवडणुका झालेल्या नाहीत यासह विविध मुद्यांवर पक्षाच्या ध्येय धोरणांवर सडकून टीका करणारे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडात पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली.

मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या आहेत हे मला माहित नाही. पण मी काँग्रेसच्या विचाराचा आहे. आम्हाला भिती आहे की लोकशाही धोक्यात आहे, असं ते म्हणाले आहेत. काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी मागणी ऑगस्ट 2020 मध्ये आम्ही केली होती. ती मागणी सोनिया गांधींनी मान्य केली. त्याबद्दल त्यांचं जाहीर आभार मानत पृथ्वीराज चव्हाणांनी काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

ते पुढं म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होत आहे. कोरोनामुळं अध्यक्षांचा थेट संवाद होत नव्हता. त्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाली नाही. यामुळं अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. ते गोपनीय होतं. ते पत्र फोडलं. काँग्रेसचा अध्यक्ष थेट नेमणुकीमुळं होऊ नये. त्यासाठी निवडणूक व्हावी, अशी आमची मागणी होती. ती आता मान्य झाली आहे.’ गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्यावर बोलताना चव्हाणांनी गोव्यात दुर्दैवी घडलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेण्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा दुर्दैवी निर्णय आहे, असं ते म्हणाले.