दि.१२(पिसीबी):मुंबईतील नामांकित लिलावती रुग्णालयात मोठी खळबळ उडाली असून माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना कार्यकारी संचालक पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या विश्वस्तांनी त्यांच्यावर खंडणी, धमक्या आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात काही डॉक्टरांनीही पुढे येत थेट आरोप नोंदवले असून विश्वस्तांकडे संबंधित कागदपत्रे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रुग्णालयाचे कायमस्वरूपी विश्वस्त राजीव मेहता यांनी सांगितले की, संचालक मंडळाने केलेल्या आरोपांचे विश्वस्तांनी खंडन केले असून परमबीर सिंह यांच्याविरोधातील पुरावे सादर केले आहेत. त्यांना राजीनामा देण्याचा पर्याय देण्यात आला होता, मात्र त्यांनी तो नाकारल्याने अखेर कारवाई करण्यात आली.
लिलावती रुग्णालयातील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आकाश संपत यांनी दावा केला की, विविध विभागातील सुमारे २० ते २५ डॉक्टरांना स्वतंत्रपणे बोलावून पदोन्नती किंवा कन्सल्टिंग डॉक्टर पदासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यास सांगण्यात आले. “माझ्याकडूनही खंडणी मागितली आणि धमकी दिली,” असा आरोप त्यांनी केला. या संदर्भात त्यांनी विश्वस्तांकडे औपचारिक तक्रार दिल्यानंतर पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
विश्वस्तांच्या म्हणण्यानुसार, परमबीर सिंह यांनी डॉक्टरांवर कोरे कागद साइन करण्यासाठी दबाव टाकून रुग्णालयात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच कामाच्या वेळेत मद्यपान करणे आणि कार्यालयात झोपणे असेही आरोप करण्यात आले आहेत. मात्र हे सर्व आरोप परमबीर सिंह यांनी फेटाळले आहेत.
विश्वस्तांनी स्पष्ट केले की, परमबीर सिंह हे फक्त कर्मचारी होते; त्यांना विश्वस्त किंवा नियुक्त्यांवर प्रभाव टाकण्याचा कोणताही अधिकार नव्हता.
सध्या तक्रारी, साक्षी आणि कागदपत्रांच्या आधारे सखोल चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले आहे.
या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून चौकशीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






































