माजी महापौर नितीन काळजेंना आता अनेक स्पर्धक

0
95

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून चऱ्होलीचे नगरसेवक आणि भाजपचे प्रथम महापौर नितीन आप्पा काळजे यांचे नाव कायम चर्चेत असते. जुन्या प्रभाग रचनेत त्यांची जागा सुरक्षित होती पण नवीन फेरबदलात एससी चे आरक्षण पडल्याने आता त्यांना असंख्य स्पर्धकांना तोंड द्यावे लागणरा आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये मोशी गावठाण, गांधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर, साई मंदिर, गोखले मळा, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, ताजणेमळा, चोवीसावाडी, चऱ्होली गावठाण आणि डुडुळगावचा समावेश आहे. या प्रभागातील पूर्वी अनुसुचित जातीचे आरक्षण नव्हते आता लोकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारी (१३.२३) वाढल्याने ते आहे. पूर्वी ४ जागांपैकी २ ओबीसी आणि २ खुल्या होत्या आता तिथे एक एससी झाली आहे.
माजी महापौर म्हणून नितीन काळजे यांचे काम आणि दांडगा संपर्क असला तरी त्यांच्या समोरील इच्छुकसुध्दा तगडे आहेत. गेल्यावेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून आमदार महेश लांडगे यांचे खंदे समर्थक युवा कार्यकर्ता सचिन तापकिर यांनी पत्नीला अपक्ष उभे केले होते. भाजपच्या महिला आघाडीच्या सर्वात जेष्ठ कार्यकर्त्या शैला मोळक यांना उमेदवारी मिळाली होती. आता या सर्वांसह माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, विनया तापकीर, प्रदीप तापकीर, लक्ष्मण सस्ते, सुवर्णा बुर्डे, नंदू दाभाडे, कुणाल तापकिर य अंकुश तापकीर असे रथीमहारथी या एका जागेसाठी स्पर्धेत असणार आहेत. एससी प्रवर्गात भाजपला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, काळजे म्हणाले, माझे आजवरचे काम, महापौर म्हणून या भागात आणलेली विकास कामे तसेच सततचा लोकसंपर्क असल्याने कितीही मोठा स्पर्धक असला तरी मला चिंता नाही. एससी जागेसाठी दोन होतकरू संभाव्य नावे समोर आहेत.