माजी मंत्र्याच्या मुलासह पाच जणांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू

0
28
  • वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार राजेंद्र हगवणे याला मदत आली अंगलट

कोल्हापूर, दि . २७ ( पीसीबी ) : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात काल सकाळी तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक झाली. जवळपास आठवड्याभरापासून त्यांचा शोध सुरु होता. अखेर शुक्रवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली. १९ ते २१ मे दरम्यान राजेंद्र हगवणे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका रिसॉर्टमध्ये मु्क्कामास होता, अशी माहिती समोर आलेली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याला काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यानं मदत केली होती.
सुनेच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणेवर गुन्हा दाखल झाला. त्याच्या पत्नी, लेकीसह मुलाला अटक झाली. पण राजेंद्र हगवणे फरार होता. आठवडाभर तो पोलिसांना गुंगारा देत होता. १९ ते २१ मेच्या दरम्यान त्याचा मुक्काम महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या हेरिटेज रिसॉर्टममध्ये होता. राजेंद्र त्याच्या २ मित्रांसह हेरिटेज रिसॉर्टवर थांबला होता. त्याचं बुकिंग प्रीतम पाटीलनं केलं होतं. प्रीतम हा माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे.

वैष्णवीचा सासरा राजेंद्र १९ मेच्या मध्यरात्री १ वाजता हेरिटेज रिसॉर्टला पोहोचला. २१ मे रोजी तो इथून निघाला. विशेष म्हणजे हगवणे केवळ रात्री रिसॉर्टवर झोपायला यायचा. रिसॉर्टमधील अन्य कोणत्याच सुविधा तो वापरत नव्हता. त्याची व्यवस्था प्रीतम पाटीलनं केली होती. राजेंद्र हगवणेला प्रीतम पाटीलकडून जेवणाचा डबा यायचा. राजेंद्र सोबत त्याचे २ मित्रदेखील रिसॉर्टमध्ये वास्तव्यास होते.

याबद्दल माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, हगवणेवर असलेल्या आरोपांची आपल्याला कल्पना नव्हती, असं उत्तर त्यांनी दिलं. ज्या दिवशी आम्हाला वैष्णवीच्या आत्महत्येबद्दल आणि त्याच प्रकरणात राजेंद्र हगवणे फरार असल्याचं समजताच आम्ही त्याला रिसॉर्ट सोडण्यास सांगितल्याची माहिती पाटील यांनी दिली. हगवणेला आश्रय दिल्यानं प्रीतम पाटील अडचण्यात आला आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला काल न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना ५ दिवसांची कोठडी सुनावली. त्यामुळे २८ मेपर्यंत दोघे कोठडीत असतील. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु आहे.