माजी मंत्री विजय वडेट्टीवारांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ

0
277

मुंबई, दि. १ (पीसीबी) : सत्ता खेचून आणणं, सत्ता राखणं, सत्ता राबवणं, सत्तेतून पक्ष वाढवणं, यापेक्षा पक्षांतल्या नेत्यांत वाद ठेवणं, ते न मिटवणं, नेत्यांच्या पायांत पाय घालणाऱ्यांना ‘छुपे’ बळ देणारे काँग्रेस नेतृत्व अखेर शहाण्यासारखे वागले आणि विधीमंडळाच्या अधिवेशनाला जेमतेम चारच दिवस उरले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवडला. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विजय वडेट्टीवारांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ घातली. या पदाच्या खुर्च्चीत बसण्यासाठी दोन माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि काही अन्य ‘वजनदार’ नेत्यांनी फिल्डिंग लावूनही त्यात वडेट्टीवारांनी बाजी मारली. विदर्भातील काही निवडणुकांत वडेट्टीवारांनी भाजपसोबत हातमिळविणी केल्याची प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची तक्रार असूनही दिल्लीतील हायकमांडनी त्यांच्या नावावर मोहोर उमटवली आहे. परिणामी, पटोले काय अन्य कोणीही वाटेला आले ; तरी हे पद खेचून वडेट्टीवारांनी दिल्ली दरबारातला ‘वट’ दाखवून दिला आहे.

ठाकरे सरकार पाडले गेल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले. सर्वाधिक आमदार असलेल्या या पक्षाचे नेते अजित पवारांनी ही जबाबदारी पार पडली. पण पुढच्या काळात अजितदादा राष्ट्रवादीतून फुटून भाजपसोबत सत्तेत गेले. त्यानंतर काँग्रेसच्या पारड्यात सर्वाधिक ४५ आमदारांचे बळ असल्याने विरोधी पक्षनेतेपदाची खुर्च्ची त्यांच्याकडे आली. विरोधी पक्षनेतेपदाचा अजितदादांनी राजीनामा दिला; तरी त्यावर कोणाला नेमायचे, यावर काँग्रेसमध्ये खल झाला. त्यात अनेक नावे पुढे आली.

खुद्द पटोलेंसह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांची नावे होती. वडेट्टीवारांच्या नावाची चर्चा झाली. नेहमीप्रमाणे आमदार संग्राम जगतापही मागे राहिले नाहीत. अधिवेशनाचे दोन आठवडे संपले तरी, नावांची चर्चा काही पुढे सरकली नाही. त्यावरून काँग्रेस मतभेद वाढल्यानेच विरोधी नेता ठरत नसल्याचे स्पष्ट झाले. अधिवेश पुढच्या चार दिवसांत संपणार आणि त्यात ही निवड अपेक्षित असल्याने पटोले दिल्लीला गेले. त्यानंतर वडेट्टीवारांच्या नावावर एकमत होऊन ते निश्‍चित करण्यात आले.

पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आल्यापासून पक्षातील काही नेते नाराज असल्याचे बोलले जाते. त्यात पटोलेंचा आक्रमक पवित्राही अनेकांना खुपतो. त्यात वडेट्टीवार हे आघाडीवर असल्याचेही दिसून आले आहे. काही महिन्यांपूर्वी बाजार समित्यांच्या निवडणुकीत वडेट्टीवार आणि त्यांच्या समर्थक काँग्रेस जिल्हाध्यक्षाने भाजपला मदत केल्याचा आरोप आहे. त्यावरून संतापलेल्या पटोलेंनी त्या जिल्हाध्यक्षाला पदावरून काढत, वडेट्टीवारांना धक्का दिला होता. पटोलेंच्या जाचाला वडेट्टीवार वैतागले होते. त्यात जिल्हाध्यक्षांवरची कारवाई आणि पटोलेंचे वागण्याकडे बोट दाखवून वडेट्टीवारांनी काहीजणांना घेऊन दिल्ली गाठली. पटोलेंविरोधात गाऱ्हाणे मांडून वडेट्टीवारांनी पक्षांतर्गत वाद उघडपणे दाखवून दिले होते. या वादात हायकमांड पटोलेंना ताकद देण्याची अपेक्षा खोटी ठरली, त्यात वडेट्टीवार उजवे ठरले. आपला जिल्हाध्यक्ष पुन्हा नेमला. त्यापलीकडे जाऊन विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीतील अर्धाडझन नेत्यांना बजुला करून पटोलेंच्या नाकावर टिच्चून वडेट्टीवारांनी हे महत्त्वाचे पद आणले. अर्थात, पटोले काय साऱ्यांच नेत्यांना विजय वडेट्टीवार पुरून उरले हे खरे.