माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना जन्मठेपे

0
2

बंगळुरू, दि. 3 ( पीसीबी )  : कर्नाटकच्या बंगळुरू येथील जनता दल सेक्युलर पक्षाचे माजी खासदार आणि पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना न्यायालयाने (Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फार्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या महिलेवरील बलात्कारप्रकरणी प्रज्वल रेवण्णावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षभरापासून याप्रकरणी न्यायालयीन खटला सुरू होता, अखेर आज बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने प्रज्ज्वल रेवण्णा यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे, जनता दल सेक्युलर पक्षाला (JDU) हा मोठा झटका मानला जातो. दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वीच प्रज्वल रेवण्णा यांच्यावरील आरोपांमुळे राजकीय वर्तुळात रान उठले होते. त्यानंतर, देशभरात हे प्रकरण चर्चेत असल्याने आजच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले होते.

बंगळुरुमधील विशेष न्यायालयाने काल (शुक्रवारी ता. 1) जनता दल (सेक्युलर) चे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला चार लैंगिक शोषण व बलात्कार प्रकरणांपैकी एका प्रकरणात दोषी ठरवले. विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी आज रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रेवण्णाने त्याच्या कुटुंबाच्या फार्महाउसमध्ये काम करणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेने मागील वर्षी एप्रिलमध्ये त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली होता. तिने रेवण्णा यांच्यावर 2021 पासून अनेकवेळा बलात्कार केल्याचा आणि या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता रेवण्णावर बलात्कार, धमकी देणे आणि अश्लील फोटो लीक करणे अशा कलमांखाली आरोप करण्यात आले होते. गेल्या वर्षी सेक्स स्कॅण्डलमध्ये समोर आल्यानंतर रेवण्णाचे नाव चर्चेत आलं होतं. रेवण्णावर 50 हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, जेव्हा रेवण्णाच्या फार्म हाऊसमधील मोलकरणीने तक्रार दाखल केली, तेव्हा प्रज्वलविरुद्ध पहिला गुन्हा 28 एप्रिल 2024 रोजी नोंदवण्यात आला. तक्रारदार महिला ही कुटुंबाच्या फार्महाउसमध्ये काम करणारी 47 वर्षीय माजी मोलकरणी होती. तिने सांगितले की प्रज्वलने तिच्यावर एकदा नाही तर दोनदा बलात्कार केला.