मुंबई दि. १९ – आम्ही आणलेल्या लाडकी बहीण योजनेत राज्यातील लाडक्या बहिणींनी आपली चांगली जबाबदारी पार पाडली आणि आम्हाला सत्तेत बसवले आहे त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी आम्ही कधीच विसरु शकत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील लाडक्या बहिणींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शिव – शाहू – फूले – आंबेडकर यांच्या
विचारधारेनेच आपण आपला पक्ष पुढे नेत आहोत. आपल्या राज्याला अनेक महापुरूषांचा वारसा लाभलेला हे आपले भाग्य आहे. त्यामुळेच राज्यात जातीय सलोखा कसा राखला जाईल यासाठी आपला प्रयत्न असतो असे आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.
देशासोबतच आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे याचा विचार आपल्या मनात असला पाहिजे. प्रगत राज्य म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे त्याला गालबोट लागता कामा नये अशा भावनाही अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली आहे. देशात जिवंत लोकशाही आहे. सुज्ञ जनता मोठ्या विचारानेच मतदान करत असते हे सांगतानाच विरोधकांनी निवडणूक आयोगावर ठेवलेल्या ठपक्याबद्दल अजित पवार यांनी चांगलेच खडेबोल सुनावले.
आपली जबाबदारी पक्ष संघटना वाढवण्याची असून पक्षात पदाधिकारी म्हणून कामे करताना कायदा हातात घेऊ नका. संविधानाचा आदर करुन, कायद्याच्या चौकटीत राहून अहिंसेने वाटचाल केली पाहिजे असा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
नाशिकमधील कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांच्यासह नॅशनल क्रिकेट खेळाडू मनोज पालखेडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे पार पडला. याशिवाय नाशिक शहर आणि देवळाली मतदारसंघातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनीही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, प्रदेश सरचिटणीस संग्राम कोतेपाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.